वन्य प्राण्यांची शिकार करणारी आंतरराज्य टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 00:05 IST2019-10-29T00:04:50+5:302019-10-29T00:05:15+5:30
बिबटाच्या कातडीसह नऊ आरोपींना अटक : राजुरा वन विभागाची कारवाई

वन्य प्राण्यांची शिकार करणारी आंतरराज्य टोळी गजाआड
राजुरा (चंद्रपूर) : वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आंतरराज्य टोळीला राजुरा येथील वनविभागाच्या भरारी पथकाने बिबटचे कातडे आणि शिकारीच्या साधनांसह नऊ आरोपींना महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातून वन कायद्यानुसार अटक केल्याची माहिती सोमवारी वनाधिकाऱ्यांनी दिली. चंद्र्रपूर जिल्हा न्यायालयाने सर्व नऊ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
राजुरा येथील वन विभागाच्या भरारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील कुसळ येथील जगदीश लिंगु जुमनाके याच्या घरी छापा मारला असता बिबटाचे कातडे आढळले. या बिबटाची शिकार तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यातील वाकडी तालुक्यातील जंगलात झाली होती. त्याचे कातडे विक्रीसाठी कुसळ येथे आणण्यात आले होते. वाकडी तालुक्यातील पेवटा व चिचपल्ली येथून प्रत्येकी तिन आरोपी, बंबारा गावातून एक आणि कोरपना तालुक्यातील कुसळ व चिंचोली येथून प्रत्येकी एक आरोपी अशा एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली. बिबट्याची शिकार करणारा मुख्य आरोपी बारीकराव यशवंत आत्राम याला पेवटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी सापळा, बिबट्याचे दात, नख, मिशा व इतर अवयव हस्तगत केले. लोखंडी सापळा बनवून देणाºया आरोपीलाही अटक केली. नऊही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९, ३४, ४४, ४८ ए, ४९ बी, ५०, ५१, व ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र्र हिरे, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक पी. जी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात राजुरा संरक्षण पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन. बासनवार, गजानन इंगळे, विदेशकुमार गलगट, वनपाल विकास शिंदे, जी. बी.जाधव, वनरक्षक ओंकार थेरे, बंडू पेंदोर, एस.व्ही. सावसाकडे,,उमेश जंगम, नरगेवार, पुल्लेवाड व पोलीस शिपाई अलीजान मो.आलम आदींनी केली. आॅक्टोबर महिन्यात तब्बल २५ दिवस चाललेल्या या मोहिमेत तेलंगणातील वाकडीचे पोलीस निरीक्षक राणा प्रताप, उपनिरीक्षक चंद्रशेखर, उद्धव मुडे, आसिफाबादचे वन अधिकारी अप्पलकोंडा व श्रीनिवास रेड्डी आदींनी सहकार्य केल्याने आरोपींना अटक करणे शक्य झाल्याची माहिती उपवनसंरक्षक गजेंद्र्र हिरे यांनी दिली.