गडचांदूरला मिळाली नगरपालिका

By Admin | Updated: August 1, 2014 00:12 IST2014-08-01T00:12:29+5:302014-08-01T00:12:29+5:30

औद्योगिक शहर गडचांदूर येथे नगर परिषद स्थापनेबाबतची अंतीम अधिसूचना आज (दि. ३१) नगर विकास मंत्रालयाने जाहिर केली आहे. १ आॅगस्टपासून नगर परिषद अस्तित्वात येत आहे.

Gadchandur gets municipal council | गडचांदूरला मिळाली नगरपालिका

गडचांदूरला मिळाली नगरपालिका

सुभाष धोटेंच्या प्रयत्नांना यश : मंत्रालयातून अधिसूचना जारी
गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथे नगर परिषद स्थापनेबाबतची अंतीम अधिसूचना आज (दि. ३१) नगर विकास मंत्रालयाने जाहिर केली आहे. १ आॅगस्टपासून नगर परिषद अस्तित्वात येत आहे. घोषणेमुळे गडचांदूर नगरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
४० हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरात नगर परिषद स्थापनेची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केल्या जात होती. आमदार सुभाष धोटे यांनी सन २०१० पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन गडचांदूर नगर परिषद स्थापन केली आहे. गडचांदूर नगर परिषद स्थापनेसंबंधी प्राथमिक अधिसूचना ३१ आॅगस्ट २०१२ ला निघाली होती. महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून गडचांदूर नगर परिषद गठीत करण्यासाठी आक्षेप मागविले होते. या सर्व आक्षेपावर अंतिम निर्णय घेऊन तब्बल दोन वर्षानंतर अंतीम अधिसूचना निघाली आहे. अंतिम अधिसूचना काढण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. विरोधकांनी नगर परिषद स्थापनेसंबंधी अनेक अडथळे निर्माण केले होते. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीनेसुद्धा गडचांदूर नगर परिषद स्थापनेचा विरोधात ठराव घेतला होता.
मात्र या सर्व अडचणीवर मात करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन अखेरीस गडचांदूर नगर परिषद स्थापनेस यश मिळाले आहे. गडचांदूर नगर परिषद स्थापनेच्या अंतिम अधिसूचनेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २४ जुलैला स्वाक्षरी केली होती. गडचांदुरात नगर परिषद स्थापनेचे वृत्त येताच सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. आज गडचांदुरात जुलूस काढून गडचांदूरवासियांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गडचांदूर नगर परिषदेची नितांत गरज होती. ४० हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे करणे सहज शक्य नव्हते, त्यामुळे ग्रा.पं.ची तारांबळ उडत होती. मात्र आता प्रतीक्षा संपली असून आता विकास कामांना गती प्राप्त होणार आहे.
शासनाने गडचांदूर नगर परिषद स्थापनेची घोषणा केल्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांचे माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी पंचायत समिती सभापती नागेराज मंगरुळकर, शहर काँग्रेस अध्यक्ष विजय ठाकूरवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष हंसराज चौधरी, माजी पं.स. सभापती महेंद्र ताकसांडे, सरपंच सुमन आत्राम, उपसरपंच पापय्या पोन्नमवार, डॉ. अनील चिताडे, विठ्ठलराव थिपे, माजी सरपंच शिवकुमार राठी, बाबाराव पुरके, डॉ. चरणदास मेश्राम, माजी शहर अध्यक्ष रमाकांत कोमावार, सतिश बेतावार, ग्रा.पं. सदस्य विक्रम येरणे, सागर ठाकूरवार, सिराज भाई, अहमद भाई, विकास भोजेकर, प्रभाकर क्षीरसागर, प्रा. शरद बेलोरकर आदींनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Gadchandur gets municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.