विसापूरच्या तीनही चिमुकल्यांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: September 6, 2014 01:43 IST2014-09-06T01:43:48+5:302014-09-06T01:43:48+5:30
खेळण्या बाळगण्याच्या वयात तीन चिमुकल्या मुलांना शाळेत जीव गमवावा लागला. याला कारणीभूत बल्लारपूर-चंद्रपूर राज्य...

विसापूरच्या तीनही चिमुकल्यांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
बल्लारपूर : खेळण्या बाळगण्याच्या वयात तीन चिमुकल्या मुलांना शाळेत जीव गमवावा लागला. याला कारणीभूत बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गाचे काम करणारी एचजीआयपीएल कंपनीने केलेला १५ ते २० फुटाचा खोल खड्डा ठरला. दरम्यान शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता येथील ग्रामीण रुग्णालयात तिनही मुलांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विसापूरकरांनी तब्बल चार तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरले. अखेर कंपनी व्यवस्थापकाने मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख २० हजार रुपये मदत जाहीर केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तिनही चिमुकल्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील नीरज विजय वैद्य (१४), क्षितिज अशोक डोंगरे (१२) व क्रिष्णा अशोक धामने (१२) या शाळकरी मुलांचा खोल खडड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल घडली. तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. ते बल्लारपूर येथील आयडीयल इंग्लिश मिडीयम शाळेचे विद्यार्थी होते. या चिमुकल्यांच्या मृत्युने गावात शोकाकूल वातावरण होते. या घटनेची माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ व पोलीस निरीक्षक निरमणी तांडी यांनी घटनेच्या दिवशी रात्री ११.३० वाजता घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. काल तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते.
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता तीनही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र थोड्याच वेळात येथे वातावरण तापले. मृतदेह स्विकारण्यास कुटुबियांनी नकार देताच पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन दंगा नियंत्रक पथकाच्या गाड्या बोलाविण्यात आला. त्यामुळे नागरिकही संतापले. दरम्यान, प्रशासनाने नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. मात्र यालाही जमावाने दाद दिली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे व एचजीआयपीेल मनमानी धोरणामुळे मोठा खड्डा पडला. यात तिघांचाही मृत्यू झाला. याला जबाबदार रस्त्याचे काम करणारी कंपनी असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
त्यानंतर दुपारी २ वाजता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कुंभारे यांच्या कक्षात उपविभागीय अधिकारी संजय दैने, जिल्हा खनीकर्म अधिकारी एस. पी. आवळे, प्रभारी तहसीलदार विकास अहीर, पोलीस निरीक्षक निरमनी तांडी, एचजीआयपीएलचे संजीव शर्मा यांनी विसापूर येथील शिष्टमंडळाशी तासभर चर्चा केली. त्यावेळी विसापूरकरांनी मृत्यूला कारणीभूत असलेल्या कंपनी व्यवस्थापनाने मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी तीन लाख रुपये आर्थिक मदतीची मागणी लावून धरली. तडजोडीतून प्रशासनाने एचजीआयपीएल कंपनीचे संजीव शर्मा यांनी प्रत्येक कुटुंबाला २ लाख २० हजार रुपये देत असल्याचे लेखी दिले.
तेव्हा शिष्टमंडळाचे समाधान झाल्यावर ग्रामीण रुग्णालयातून तिनही मुलांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. अत्यंत शोकाकूल वातावरणाात क्रिष्णा धामने याची अंत्यविधी पार पडली. तर नीरज वैद्य व क्षितिज डोंगरे यांच्या पार्थिवावर विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साऱ्यांचे डोळे पाणावले होते. विसापूरकारंनी बंद पाडून आदरांजली वाहिली. (शहर प्रतिनिधी)