कोरोनामुळे घरीच मृत्यू झालेल्या वृद्धेवर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:02+5:302021-04-23T04:30:02+5:30
फोटो भिसी : येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास एका वृद्ध महिलेचे कोरोनामुळे घरीच निधन झाले. सदर मृत ...

कोरोनामुळे घरीच मृत्यू झालेल्या वृद्धेवर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार
फोटो
भिसी : येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास एका वृद्ध महिलेचे कोरोनामुळे घरीच निधन झाले. सदर मृत महिलेचा अंत्यसंस्कार प्रशासनाने करावा, असा तगादा नातेवाइकांनी प्रशासनामागे लावला. चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ यांच्या आदेशानुसार स्थानिक पोलीस विभाग व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार पार पाडला. मात्र घरून प्रेत उचलण्यासाठी व स्मशानभूमीत प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एकही नातेवाईक पुढे आला नाही.
खड्डा खणणे अथवा चितेसाठी लाकडं देणे, हेसुद्धा कोणी केले नाही. स्मशानातसुद्धा मुलगा, मुलगी, नातू, अन्य नातेवाईक यापैकी कोणीच आले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांनी दिली. कोरोनाकाळात माणुसकी कशी आटत चालली आहे, याचा प्रत्यय बुधवारी भिसीवासीय जनतेला या अंत्यसंस्कारातून आला.
भिसी वॉर्ड क्रमांक तीन येथील या महिलेला एका आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना भरती करण्यासाठी नेले असता जागेअभावी त्यांना भरती न करता घरी पाठविण्यात आले. त्यानंतर या वृद्ध महिलेचा स्वतःच्या घरी कोरोनामुळे मृत्यू झाला. नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला माहिती देत या महिलेचा अंत्यसंस्कार करावा, अशी विनंती केली. तिचा एक मुलगा कोरोना पॉजिटिव्ह आहे व दुसरा मुलगा नागपूर येथे आहे, असे प्रशासनाला सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य प्रशासनाने चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ यांना सदर माहिती दिली.
त्यानंतर सपकाळ यांनी मंडळ अधिकारी (महसूल) भिसी पोलीस स्टेशन, वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत यांना आदेश देऊन सदर वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्था करायचे सांगितले. पोलीस निरीक्षक मनोज गभणे, हेड कॉन्स्टेबल कपूरचंद खरवार, पोलीस शिपाई ताटेवार, ग्रामपंचायत कर्मचारी जावेद शेख, एक होमगार्ड व पोलीस विभागाने मृतदेह उचलण्यासाठी तयार केलेले भिसी येथील बाहेरचे दोन मजूर, एवढीच माणसं अंत्यसंस्काराला उपस्थित होते.