उत्पादनासाठी खर्च करुनही पदरी निराशाच
By Admin | Updated: March 14, 2015 01:09 IST2015-03-14T01:09:17+5:302015-03-14T01:09:17+5:30
वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती ...

उत्पादनासाठी खर्च करुनही पदरी निराशाच
कोरपना: वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती सिंचनासाठी अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. सोबतच विजेच्या भारनियमनामुळे उभी पिके वाळतात. परिणामी,उत्पादनासाठी खर्च करुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत असल्याची विदारक स्थिती आहे. अनेकदा पिकांच्या उत्पादनावर होणारा खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांबाबतच्या सरकारच्या उदासिन धोरणामुळे बळीराजाने शेती करायची कशी, असा प्रश्न पडला आहे.
मुळात शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असून उदरनिर्वाहाचा खर्च वाढत चालल्याने महागाईची झळ शेतकऱ्यांना सोसणे कठीण झाले आहे. मागील जमाखर्चाचा हिशेब तो मांडू शकत नाही, आणि मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून निष्पन्नही काहीच होत नाही. पेरणीच्यावेळी खत विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने खतांची विक्री होते. बियाण्यांचे दरही वाढत असल्याने जमाखर्चाचा त्याला मेळ घालता येणे अवघड झाले आहे. शिवाय किटकनाशके, तणनाशकांच्या किंमतीही गगणाला भिडल्या असल्याने शेतकऱ्यांना खते, तणनाशकांची फवारणी करणे परवडत नाही. त्यामुळे पुढील हंगामासाठी पैशाची तजवित कशी करायची? असा प्रश्न आवासून त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
सध्या शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवीन पेव फुटले असून शेतकऱ्यांच्या जीवनपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शेतीतील घटत्या उत्पादनामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे निव्वळ शेतकऱ्यांचीच शेतात मजूरीच होत असल्याचे भयाणक चित्र पहावयास मिळत आहे. कृषी विभागाच्या योजनांचा मोठा गाजावाजा होत असताना गरजू शेतकऱ्यांना खरेच या योजनांचा लाभ मिळतो का, असलेल्या योजना त्यांना मिळत नसतील तर त्या योजना काय कामाच्या, शेतीच्या नावावर शासन दरबारी मोठी रक्कम खर्च होत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे उत्पादन कमी का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील शेतकऱ्यांना अद्यापही शेतीचे कोडे सुटत नाही. उत्पादनाला भाव कमी मिळत असल्याने शेती करायची कशी, या विवंचनेत बळीराजा अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)