नव्या सीईओसमोर सभापतींनीच वाचला प्रलंबित समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:29+5:30
जि. प. स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्यानेच रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, सर्व सभापती व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोरोनामुळे प्रत्यक्षात सभा घेण्यास राज्य शासनाकडून प्रतिबंध होता. मात्र, परवानगी मिळाल्याने पहिल्याच सभेत सभापतींसह उपस्थित सदस्यांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करून प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधले.

नव्या सीईओसमोर सभापतींनीच वाचला प्रलंबित समस्यांचा पाढा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेत वारंवार समस्या मांडूनही निपटारा होत नाही, असा आक्षेप नोंदवून खुद्द सभापतींनीच नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचल्याने मंगळवारी पार पडलेली स्थायी समितीची सभा जि. प. च्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे जि. प. शाळेत विनापरवानगीने आठवा वर्ग सुरू करणाऱ्या मुख्याध्यापकासह केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश सीईओ सेठी यांनी दिले.
जि. प. स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्यानेच रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, सर्व सभापती व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोरोनामुळे प्रत्यक्षात सभा घेण्यास राज्य शासनाकडून प्रतिबंध होता. मात्र, परवानगी मिळाल्याने पहिल्याच सभेत सभापतींसह उपस्थित सदस्यांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करून प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधले. नवरगाव येथील भाड्याने दिलेल्या जि. प. शाळेचाही विषय चर्चेत आला.
घरकूलसाठी लाच मागल्याचा विषय ऐरणीवर
ब्रह्मपुरीत घरकुल लाभासाठी ५ हजार रुपए मागितले जात असल्याचाही विषयही सभेत आला. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून सदस्य आक्रमक झाले होते.
अध्यक्ष व सभापतींमध्ये कलगीतुरा
- सभापतींनीच विविध समस्यांचा पाढा वाचण्यास सुरूवात करताच अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी आपल्या कक्षात हे विषय सोडविता येऊ शकतात, या शब्दात सभापतींना आश्वास्त केले. मात्र, सभापतींची खुर्ची आणि कक्षातही हे प्रश्न सुटत नसल्याने सभेत मांडावे लागत असल्याची उघड नाराजी तीन सभापतींनी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
अभियंत्या नियुक्तीत घोळ
- बांधकाम विभागातील २८ सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यांचे प्रमोशन झाले आहे. त्यांच्या काही दिवसातच नियुक्त्या होणार आहेत. मात्र, आधी या विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या आस्थापनेवर पाठवावे आणि त्यानंतरच अभियंत्यांची नियुक्ती करावी. मात्र, चुकीचे निर्णय घेऊन घोळ घालू नये, अशाही सूचना सदस्यांनी केल्या.