मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना लागले डोहाळे; राजकीय चर्चांना आले उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 13:57 IST2022-02-21T13:50:38+5:302022-02-21T13:57:57+5:30
चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एप्रिल महिन्यात मनपाचा कार्यकाळ संपत असून, नवीन प्रभागरचनेचा आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने पाठविला आहे.

मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना लागले डोहाळे; राजकीय चर्चांना आले उधाण
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यामध्ये संपत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांसह अपक्ष आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सभा, बैठका, विकासकामांचे उद्घाटन, नागरिकांच्या समस्यांवर विचारमंथनही केले जात आहे. दुसरीकडे काही इच्छुक नव्या उमेदवारांना नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी नगरसेवक म्हणून शहरातील विविध भागात बॅनर्स लावत राजकीय हवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एप्रिल महिन्यात मनपाचा कार्यकाळ संपत असून, नवीन प्रभागरचनेचा आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने पाठविला आहे. जुन्या प्रभागानुसार शहरात १७ प्रभाग आणि ६६ नगरसेवक आहेत. नवीन प्रभागानुसार एका प्रभागात तीन नगरसेवक राहणार असून, २६ प्रभाग तसेच ७७ नगरसेवक राहण्याची शक्यता आहे.
अगदी काही दिवसांत मनपाचा कार्यकाळ संपणार असल्याने भाजपसह इतर राजकीय पक्षांनी शहरात सभा, बैठका, विकासकामांचे उद्घाटन करणे सुरु करून वातावरण निर्मिती सुरु केली आहे. निवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्या काहींनी राजकीय नेत्यांची भेट घेणेही सुरु केले आहे. काहींनी भावी नगरसेवक म्हणून शहरातील विविध भागात बॅनर्स लावले असून, वातावरण निर्मिती सुरु केली आहे. जिथे जमेल त्या पक्षाकडून निवडणूक लढवायची, कुठेच नाही जमले नाही तर शेवटी अपक्ष म्हणून उभे राहण्याचीही तयारी सुरु केली आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत नागरिक कोणाला पसंती देणार, हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.
मनपातील पक्षीय बलाबल
भाजप- ३६
काँग्रेस- १२
बीएसपी-०८
राष्ट्रवादी ०२
शिवसेना-०२
मनसे -०२
अपक्ष -४
सध्याचे प्रभाग -१७ नगरसेवक ६६
नवे प्रभाग -२६ नगरसेवक ७७
चार नगरसेवकांचा एक प्रभाग
महापालिकेच्या १७ प्रभागांमध्ये सद्यस्थितीत ६६ नगरसेवक आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार यामध्ये वाढ होणार असून, २६ प्रभागात ७७ नगरसेवक असतील, असे बोलले जात आहे.
मोर्चेबांधणी सुरु
महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून राजकीय पक्षांसह काही अपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काही राजकीय पक्षांनी बैठकाही घेतल्या असून, वार्डातील संभावित उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही दिवसांपूर्वीच बैठक पार पडली. मागील निवडणुकीतील उमेदवारांना मिळालेल्या मतांनुसार त्या - त्या पक्षांना जागा वाटप करण्याचेही यावेळी ठरविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.