पैसे दुप्पट करण्याच्या आमिषातून फसवणूक
By Admin | Updated: August 10, 2014 22:55 IST2014-08-10T22:55:31+5:302014-08-10T22:55:31+5:30
विमा पॉलिसीच्या नावावर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून विमा अभिकर्त्याने वृद्धाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वृद्धाने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूकीचा

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषातून फसवणूक
चंद्रपूर : विमा पॉलिसीच्या नावावर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून विमा अभिकर्त्याने वृद्धाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वृद्धाने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
भद्रावती येथील ज्येष्ठ नागरिक दौलत नारायण पवार यांनी आपल्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी पत्नीच्या नावे एलआयसी कार्यालय शाखा वरोरा येथे २५ मार्च २००८ ते मार्च २०११ पर्यंत साडेचार लाख रुपये घराशेजारीच राहणाऱ्या विमा अभिकर्ता मुर्लीधर विष्णूपंत कुलकर्णी यांच्यामार्फत जमा केले.
मात्र, मुर्लीधर कुलकर्णी यांनी आपल्या स्वार्थापोटी जास्त व्याज मिळते, असे सांगून दोन लाख तीस हजार रुपये एलआयसी शाखेत आणि उर्वरीत दोन लाख तीस हजार रुपये दामदुप्पट होईल असे सांगून दुसऱ्या बँकेत भरत असल्याचे सांगितले. कुलकर्णी यांच्याबद्दल शहरात आणि इतर ठिकाणी त्यांनी केलेल्या फसवणूकीच्या चर्चा होत्या. त्यामुळे शंका आल्याने एप्रिल २०१३ मध्ये दिलेल्या चार धनादेशाची रक्कम परत करण्यास त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी टाळाटाळ करुन मूळ रक्कम देण्यास एक वर्ष लावले. दुप्पट व्याज तर मिळालेच नाही.
२५ एप्रिल रोजी मिळालेल्या कागदपत्रांद्वारे दोन लाख वीस हजार रुपये कुलकर्णी यांनी केव्हाच लंपास केल्याचे निदर्शनास आले. एलआयसीमध्ये जमा असलेली रक्कम दोन लाख तीन हजार रुपये तसेच इतर दोन विमा पॉलिसीमधून ६१ हजार दोनशे पन्नास रुपयांचा कुलकर्णी यांनी गैरव्यवहार करुन फसवणूक केली आहे. या रकमेतून केवळ ६० हजार रुपये २१ एप्रिल २०१४ ला परत मिळविले. परंतु दोन वर्षापूर्वी कर्ज म्हणून काढलेल्या विमा पॉलिसीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दामदुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या कुलकर्णी यांच्या विरुद्ध दौलत पवार यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात ३ आॅगस्टला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर कारवाई करुन रक्कम परत मिळवून देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)