चंद्रपुरात चार ठिकाणी घरफोड्या

By Admin | Updated: May 11, 2016 01:20 IST2016-05-11T01:20:51+5:302016-05-11T01:20:51+5:30

चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. एका किराणा दुकानासह चार

At four places in the city, | चंद्रपुरात चार ठिकाणी घरफोड्या

चंद्रपुरात चार ठिकाणी घरफोड्या

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. एका किराणा दुकानासह चार कुलूप बंद घरांना लक्ष्य करीत या चोरट्यांनी हात साफ केला. यामुळे परिसरात कमालिची दहशत निर्माण झाली आहे. किराण दुकान वगळता अन्य घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.
हवेली गार्डन चौकात श्याम जेठवाणी यांचे किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सदर दुकानाचे शटर लोखंडी सळाखीने वर उचलून आत प्रवेश केला व दुकानातील रोख २५ हजारांची रक्कम लंपास केली. त्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा हवेली गार्डनकडे वळविला. अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील तिसऱ्या माळ्यावर राहणारे अमित ठाकूर यांच्या प्लॅटचे दार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर रामलक्ष्मण अपार्टमेन्टमधील गिरीश डोर्लीकर, निशिगंधा अपार्टमेन्टमधील नारायण बनकर यांचीही घरे चोरट्यांनी फोडली. मात्र घरात चोरट्यांना काहीही मिळाले नाही. विशेष म्हणजे ही सर्व घरे कुलूप बंद होती. आजुबाजुच्या दारांच्या कड्या बाहेरून बंद करून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे हवेली गार्डन चौकातील श्याम जेठवाणी यांच्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. मात्र घटनेच्या रात्री दुकानाबाहेरील सर्व लाईट बंद करण्यात आल्याने सीसीटीव्ही कॅमेरा निरूपयोगी ठरली.
मंगळवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर श्याम जेठवाणी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, रामनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रदीपसिंह परदेसी यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
सायंकाळी उशिरापर्यंत चोरट्यांचा मागमूस लागला नव्हता. दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता, नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचना द्यावी, असे आवाहन रामनगरचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह राजपूत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: At four places in the city,