Former city president Deepak Jaiswal arrested for smuggling alcohol | माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांना दारू तस्करीत अटक

माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांना दारू तस्करीत अटक

ठळक मुद्दे१५ लाखांचा दारूसाठा जप्त : दारूबंदी उठविण्याच्या मागणीची निघाली हवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष व महानगर पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास रामनगर पोलिसांनी दारू तस्करीत अटक केली. या घटनेने चंद्र्रपूरची दारूबंदी फसवी आहे. दारूबंदी हटवा या कांगाव्यामागील सत्यावरून पडदा सदर कारवाईने हटला आहे.
नगरसेवकाला सहकार्य करावे अथवा दारूबंदीचे समर्थन करावे, अशी गोची या कारवाईने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. यापूर्वी दीपक जयस्वाल यांच्याविरूद्ध दारू तस्करीचे गुन्हे दाखल असून याचा छडा लावणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यामुळे दारूबंदीचा विरोध कशासाठी सुरू होता, याचे बिंग फुटल्याची चर्चा या कारवाईनंतर शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून ऐकायला येत होत्या.
ही कारवाई सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वडगाव चौक गजानन महाराज मंदिरासमोर करण्यात आली. या कारवाईत माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल (५७) यांच्यासह मयुर लहरीया (२२), राकेश चित्तुरवार (३२) रा. चंद्रपूर या तिघांना अटक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या या कारवाईमुळे शहरात विविध चर्चांना उधान आले आहे.
वडगाव चौकात एका वाहनातून दारूसाठा उतरविण्यात येत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वडगाव चौकातील दीपक जयस्वाल यांनी किरायाने घेतलेल्या एका गोदामावर मोठ्या लवाजम्यासह धाड टाकली. यावेळी एमएच ३१ सीएम ६०३० या वाहनातून दारूसाठा उतरवत असल्याचे पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन ज्याठिकाणी दारू उतरविण्यात येत होती. त्याठिकाणीही तपासणी केली असता ३० पेट्या देशी, व १८ पेट्या विदेशी दारू आढळून आली. यानंतर पोलिसांनी जयस्वाल, मयुर लहरीया, चित्तुरवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, सदर दारूसाठा जयस्वाल यांच्या मालकीचा असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. ही कारवाई एसडीपीओ नांदेडकर यांच्या नेतृत्वात ठाणेदार हाके, पीएसआय लाकडे यांनी केली.

दारूबंदी उठविण्याच्या मागणीमागील विदारक सत्य
दारूबंदी झाल्यापासून काही मंडळी विविध भावनिक कारणे पुढे करुन सातत्याने दारूबंदी उठविण्याची मागणी करीत आहे. ही मागणी कारणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल आघाडीवर होते. दारूविक्रेत्यांची अधिकृत दुकानदारी बंद झाल्यानेच ही मागणी सुरू होती. आता खुद्द दारूबंदी हटविण्याची मागणी करणारेच दारूतस्करीत अडकल्याने या मागणीची हवाच निघाल्याचा सूर चंद्र्रपुरातील सुज्ञ नागरिकांमध्ये उमटत होता.

पोलिसांनी तपासावा आरोपींचा मोबाईल
दीपक जयस्वाल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केल्यानंतर शहरात उलटसुलट चर्चांना पेव आले आहे. दरम्यान, जयस्वालचा मोबाईल पोलिसांनी तपासल्यास यातून मोठे घबाड बाहेर निघण्याची शक्यता आहे. त्यांना राजकीय वरदहस्त आहे का, हेही उघड होऊ शकेल.

अटकेतील सर्व आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दीपक जयस्वाल यांच्यावर अवैध दारु विक्रीसंदर्भात विविध गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्ह्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
- शिलवंत नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्र्रपूर.

Web Title: Former city president Deepak Jaiswal arrested for smuggling alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.