तपासाची सूत्रे आता एसडीपीओंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:57 IST2017-11-26T23:56:53+5:302017-11-26T23:57:05+5:30
येथील काजल मृत्यू प्रकरण आता गंभीर झाले आहे. काजलच्या वडिलांसह आता विविध पक्षांचे पदाधिकारी, माना समाज व इतर नागरिकही प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी करू लागले आहेत.

तपासाची सूत्रे आता एसडीपीओंकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : येथील काजल मृत्यू प्रकरण आता गंभीर झाले आहे. काजलच्या वडिलांसह आता विविध पक्षांचे पदाधिकारी, माना समाज व इतर नागरिकही प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी करू लागले आहेत. ‘लोकमत’ सातत्याने या प्रकरणाकडे लक्ष वेधत आहे. त्यामुळे अखेर खुद्द उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाच या प्रकरणाची सूत्रे आपल्या हाती घ्यावी लागली आहे.
काजल मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्नांची उकल पोलिसांकडून होऊ शकली नाही. काजलची आत्महत्या की घातपात, आत्महत्या असेल तर त्याला कारणीभूत कोण, काजल मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्यानंतर कुठे गेली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकमतने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी मृत काजलचे मोठे वडील काशीनाथ हनवते व त्यांचे कुटुंब यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी माना समाजाचे तालुका अध्यक्ष हरीभाऊ बारेकर, लोनवाहीचे ग्रा.पं. सदस्य रवी सावकुडे, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अरुण कोलते यांच्या समक्ष त्यांचे बयाण नोंदवण्यात आले. मागील चार दिवसांपासून ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरल्याने शहरात ठिकठिकाणी आता याच प्रकरणाची चर्चा होत आहे. शिवसेना-भाजपा-मनसे-काँग्रेस या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हनवते कुटुंबियांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन करीत ‘आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे सांगितले. विशेष म्हणजे, प्रारंभी पोलीसच हे प्रकरण दडपण्याच्या मनस्थितीत होते, असे खुद एका पोलीस कर्मचाऱ्यांनेच ‘लोकमत’ ला सांगितले.
पुन्हा शवविच्छेदन करा - मागणी
काजलच्या शवविच्छेदनावर संशय व्यक्त करीत काशीनाथ हनवते यांनी तिचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. तसेच या प्रकरणात ज्या मुला-मुलींचे नावे समोर येत आहेत, त्यांना बोलावून चौकशी करण्यात यावी. तपासाला गती द्यावी, पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.