तलाव खोलीकरणाचा विसर

By Admin | Updated: April 27, 2015 00:54 IST2015-04-27T00:54:12+5:302015-04-27T00:54:12+5:30

सध्या संपूर्ण देशातच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविण्यासाठी शासनदरबारी विचार केला जात आहे.

Forget the depth of the pool | तलाव खोलीकरणाचा विसर

तलाव खोलीकरणाचा विसर

लोकमत विशेष
रवी जवळे चंद्रपूर
सध्या संपूर्ण देशातच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविण्यासाठी शासनदरबारी विचार केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न राज्यभरात जोरदार सुरू आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. तलाव आणि विहिरींना ग्रामीण भागातील मुख्य जलस्रोत म्हटले जाते. मात्र गतकाळात डोकावून बघितले तर या जलस्रोतांविषयी प्रशासन आणि पर्यायाने शासनाला काही देणेघणे असावे, असे वाटत नाही. तलावात वर्षानुवर्षांपासून साचलेला गाळ काढून तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रशासनाला विसरच पडला आहे. गावागावांतील विहिरींचीही अशीच दैना आहे. त्यामुळे या जलस्रोतांची साठवण क्षमताच कमालीची कमी झाली आहे. परिणामी दरवर्षी पाणी टंचाईच्या भर पडत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा कमालीचा तापतो, हे सर्वांना ठाऊक आहे. मे महिना आला की जिल्ह्यातील जलस्रोट आटतात. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील भलेमोठ्या सिंचन प्रकल्पातील जलसाठाही ड्राय होतो. असा अनुभव आजवर अनेकदा आला आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पाण्याची पातळीदेखील कमालीची खालावते. विहिरी, तलावांमध्ये पाणीसाठा नसतो. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात सिंचन तर सोडाच; प्यायलाही पाणी मिळत नाही. वणवण भटकंती करावी लागते. जिवती, कोरपनासारख्या तालुक्यात तर पाण्याचे दुर्भिक्ष एवढे भयाण असते की चक्क डबक्यातील पाणी काढून नागरिकांना प्यावे लागते.
जिल्ह्यात सुमारे मध्यम, लघू व मामा तलावांची संख्या सोळाशेहून अधिक आहे. हे तलाव साधरणत: गावाशेजारी असल्यामुळे ग्रामीण भागात या तलावांना मोठे महत्व असते. महत्त्वाचे जलस्रोत म्हणूनच या तलावांकडे बघितले जाते. या तलावांमुळे गावखेड्याची तहान भागते. शिवाय शेतकऱ्यांचे सिंचनही होते. या तलावांचा महत्वाचा फायदा असा की या तलावांमुळे गावातील पाण्याची पातळीही कायम असते. तलाव आटले की पाण्याच्या पातळीवरही परिणाम होतो. त्यामुळे बोअरवेल, विहिरी आपसुकच आटतात. जिल्ह्यातील तलावांची स्थिती सध्या दयनीय आहे. वरकरणी हे तलाव पाण्याने भरलेले दिसत असले तरी तलावांची पूर्वीची साठवण क्षमता आता राहिलेली नाही. या तलावात वर्षानुवर्षांपासून गाळ साचलेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या तलावात गाळ साचतो. मात्र तो काढला जात नाही. २०१२-१३ या वर्षात अतिवृष्टी झाली होती. तब्बल तीनवेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी अनेक तलाव फुटले, क्षतीग्रस्त झाले. पाटबंधारे विभागाकडून याचे सर्वेक्षणही झाले. मात्र या तलावांची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याची माहिती आहे. याशिवाय जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतक्या तलावातील गाळ उपसला जातो. त्यामुळे तलावांची दैनावस्था होत आहे.

Web Title: Forget the depth of the pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.