‘त्या’ वाघावर वनविभागाचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 23:20 IST2022-11-16T23:16:44+5:302022-11-16T23:20:21+5:30
या भागात अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक असल्याने शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी व शेतकरी वर्गाकडून केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन वनविभागाने हल्ला करणारा वाघ नेमका तोच आहे का, याची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे.

‘त्या’ वाघावर वनविभागाचा ‘वॉच’
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : ढोरपा पाहार्णी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या वाघावर वनविभागाने पाळत ठेवणे सुरू केले आहे. यासाठी अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, मनुष्यबळाची गस्तही वाढविण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी ढोरपा येथील सविता सोमेश्वर भुरले (५३) या शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने यावेळी शेतातच असलेला तिचा पती तिच्या मदतीला धावल्याने ती या हल्ल्यातून बचावली. मात्र, याच महिन्यात याच परिसरात मोडणाऱ्या पान्होळी आणि टेकरी येथेही वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला. या घटनांनी परिसरातील जनजीवन चांगलेच प्रभावित झाले आहे. एवढेच नाही, तर शेतकरी वर्गात दहशतही पसरली आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक असल्याने शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी व शेतकरी वर्गाकडून केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन वनविभागाने हल्ला करणारा वाघ नेमका तोच आहे का, याची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे. याशिवाय त्या परिसरात गस्तही वाढविली आहे. या गस्तीवर वनपरिक्षेत्राधिकारी हजारे हे लक्ष ठेवून आहेत. गस्तीमध्ये राउंड ऑफिसर, वनरक्षक, वनमजूर आणि पीआरटी सदस्यांचा समावेश आहे. हे पथक हल्लेखोर वाघ नेमका तोच आहे का, याची पडताळणी करीत आहेत.
एक नाही, अनेक वाघ
एक नाही, तर एकापेक्षा अधिक वाघ आहेत, असे गावकरी सांगत आहेत. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. हा परिसर उमरेड कऱ्हांडला या अभयारण्याजवळ आहे. येथील वाघ भ्रमंतीसाठी या परिसरात येत असावेत. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ याची या परिसरात भ्रमंती असायची. जय जेव्हा बेपत्ता झाला होता, तेव्हा या परिसरात त्याचे लोकेशन घेण्यात येत होते. शिवाय याच जयचा बछडा म्हणून ओळखल्या जायचे. त्या श्रीनिवासन या वाघाची हत्या याच परिसरात झाली होती.