गडबोरीत वनविभागाची गस्त; २० कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:38 IST2019-06-05T00:37:13+5:302019-06-05T00:38:29+5:30
सिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे रविवारी एका लहान बालकाला बिबट्याने घरातून पळवून ठार केले. या घटनेनंतर गावात बिबट्याची दहशत आहे. विशेष म्हणजे, नागरिक शेतशिवारात तसेच सायंकाळी गावाबाहेर जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान, वनविभागाने २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात गस्त सुरु केली असून गावाभोवती चार पिंजरे लावले आहे.

गडबोरीत वनविभागाची गस्त; २० कर्मचारी तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे रविवारी एका लहान बालकाला बिबट्याने घरातून पळवून ठार केले. या घटनेनंतर गावात बिबट्याची दहशत आहे. विशेष म्हणजे, नागरिक शेतशिवारात तसेच सायंकाळी गावाबाहेर जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान, वनविभागाने २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात गस्त सुरु केली असून गावाभोवती चार पिंजरे लावले आहे.
नरभक्षक बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाने घटनास्थळापासून परिसरात १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती नवरगाव क्षेत्र सहाय्यक बुले यांनी दिली.
बालकाला पळवून नेल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावात एकच गर्दी उसळली होती. ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना माहिती होताच त्यांनी मृत स्वराजचे वडील सचिन गुरनुले यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यानंतर ३ जून रोजी माजी आमदार अतुल देशकर यांनी मृतक कुटुंबीयांची भेट घेत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दोन महिन्यात बिबट गावात सिरकाव करीत होता. त्यात गावातील ५० ते ६० शेळ्या फस्त केल्या. वारंवार गावकऱ्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. मात्र वनविभागाने कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. आजपर्यंत गावात येऊन गोठ्यातील शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. परंतु वनविभागाकडून अत्यल्प मोबदला दिल्या जात असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशीही मृतक स्वराजच्या घराजवळ रात्री बिबट आला होता, अशी माहितीही काही ग्रामस्थांनी दिली. अजूनही गावकऱ्यांत बिबट्याची दहशत कायम आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे गावकºयांला कठीण झाले आहे. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
तालुका दहशतमुक्त करण्याची मागणी