चंद्रपुरातच होणार न्यायवैद्यक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:45 IST2019-07-08T22:44:45+5:302019-07-08T22:45:07+5:30

पुराव्याअभावी सुटलेल्या गुन्हेगारांचे साम्राज्य नष्ट करण्याकरिता फॉरेन्सिक लॅबचा पुरेपूर वापर करावा. चंद्रपुरात ही सुविधा निर्माण झाल्याने गुन्हेगार आता सुटणार नाहीत. दोष सिद्धीला गती येईल.

Forensic examination will be done in Chandrapur alone | चंद्रपुरातच होणार न्यायवैद्यक तपासणी

चंद्रपुरातच होणार न्यायवैद्यक तपासणी

ठळक मुद्देहेमंत नगराळे : लघु न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुराव्याअभावी सुटलेल्या गुन्हेगारांचे साम्राज्य नष्ट करण्याकरिता फॉरेन्सिक लॅबचा पुरेपूर वापर करावा. चंद्रपुरात ही सुविधा निर्माण झाल्याने गुन्हेगार आता सुटणार नाहीत. दोष सिद्धीला गती येईल. पोलीस व लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवावा, अशा सूचना न्यायिक व तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिल्या. राज्य शासनाने जीवशास्त्र व विषशास्त्र हे दोन विभाग समाविष्ट असलेल्या वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉ. कृष्णा कुलकर्णी, लघु न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेचे प्रभारी उपसंचालक मनोज भांडारकर, नागपूर प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींची उपस्थिती होती. चंद्रपुरातील तुकूम परिसरातील गोपाल नगरात लघु न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत विषशास्त्र विभाग व जीवशास्त्र विभाग असे एकूण दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी विषशास्त्र विभागामध्ये शेतकरी आत्महत्या, विषप्राशन, मद्य प्राशनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे नमुने, उलटी, पोटातील पाणी व रक्ताचे रासायनिक विश्लेषण केले जाते. जीवशास्त्र विभागामध्ये खून, बलात्कार, सर्पदंश अशा विविध प्रकरणांमध्ये रक्तगट, विर्य परिक्षण, सर्पविषाचे विश्लेषण करण्याची सुविधा आहे. सदर प्रयोगशाळेत चंद्र्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रकरणांचे विश्लेषण केले जाणार आहे. ही सुसज्ज प्रयोगशाळा आजपासून सुरू झाली. राज्यातील अन्य प्रयोगशाळांप्रमाणे सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. न्यायिक व तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक नगराळे म्हणाले, अतिमहत्त्वाच्या प्रकरणांना प्राथमिकता द्यावी. प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहावे. तपास अहवाल सादरीकरणावर होणारा विलंब टाळावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाºयांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. खेमनार व पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संचालक डॉ. कुलकर्णी यांनी केले. डॉ.मनोज भांडारकर यांनी आभार मानले. यावेळी पोलिस विभागाचे व प्रयोगशाळेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वैज्ञानिक पुरावा तात्काळ मिळणार
राज्यात मुंबई येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. अलीकडे गुन्हे करताना अत्याधुनिक विविध पद्धती व सामुग्रीचा वापर करीत आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जप्त केलेल्या पुराव्यांवर रासायनिक विश्लेषण करून सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून तपास यंत्रणा व न्यायालयाला महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करून देण्याचे काम प्रयोगशाळा करणार आहे.
असा होतो दोष सिद्ध
पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांच्या प्रवृत्तीवर आळा घालावा लागतो. आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुराव्याची आवश्यकता असते. अन्यथा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात. परंतु फॉरेन्सिक लॅबमुळे पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करता येतो. हे पुरावे पोलिसांकडून न्यायालयात सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावरच न्यायाधीश न्याय देतात. पोलीस तपासासाठी फॉरेन्सिक लॅब हा अत्यंत अविभाज्य व महत्त्वाचा घटक आहे. यातून गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी दिली.

Web Title: Forensic examination will be done in Chandrapur alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.