परक्या मिरचीनेच दिला ‘त्यांना’ आधार
By Admin | Updated: February 9, 2016 00:47 IST2016-02-09T00:47:50+5:302016-02-09T00:47:50+5:30
मिरची भलेही नागभीड तालुक्यातील पीक नसेल पण याच मिरचीने या तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

परक्या मिरचीनेच दिला ‘त्यांना’ आधार
हाताला मिळाले काम : मिरचीचा ठसकाही झाला आता गोड
घनश्याम नवघडे नागभीड
मिरची भलेही नागभीड तालुक्यातील पीक नसेल पण याच मिरचीने या तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. नागभीड तालुक्यातील बाम्हणी, कानपा आणि मोहाळी येथे भेट दिली तर याची प्रचिती येते.
नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धान आहे. या एका पिकावर तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. पण दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील धान शेती भकास होत चालली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या धोरणाने शेतकरीही हतबल झाले आहेत. उद्योगाच्या बाबतीतही नागभीड तालुका कोसो दूर मागे आहे.
उद्योगाविरहीत तालुका अशीच नागभीडची ओळख आहे. त्यामुळे येथील तरुणांना आणि लोकांना बेकारीचेच जीवन जगावे लागत आहे. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील बाम्हणी, मोहाळी आणि कानपा येथे सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मिरचीचे सातरे सुरु असून शेकडो मजूर त्या ठिकाणी कामाला जावून रोजगार प्राप्त करुन घेत आहेत.
अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील बाम्हणी, मोहाळी आणि कानपा येथे सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मिरचीचे सातरे सुरु असून शेकडो मजुर त्या ठिकाणी कामाला जावून रोजगार प्राप्त करुन घेत आहेत. येथील सातरे पाहून अनेकांना समज होत आहे की, ही मिरची एक तर भिवापूर येथून किंवा नागपूर जिल्ह्यातून येत असावी. पण हा समाज पूर्णत: चुकीचा आहे. या सातऱ्यावर येणारी मिरची आंध्रप्रदेशातून मिरची ट्रकाद्वारे आणल्या जाते. तिथे मिरचीच्या मुक्या काढल्या जातात. त्यासाठी एका बोऱ्यावर मजुरांना ५०० रुपये मोबदला दिला जातो. एक जोडी दीड दिवसात एक बोरा मिरचीच्या मुक्या काढण्याचे काम करते. आता हे सातरे गावातच सुरु झाल्याने या मजुरांनी मुलांनाही या कामावर लावून घेतले आहे. त्यामुळे या मजुरांना दरडोई १५० ते २०० एका दिवसाचा मोबदला मिळतो. मिरची स्वच्छ झाली की देशविदेशात निर्यात होते.
शासनाने मग्रारोहयोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कबुल केले असले तरी शासनाचे हे आश्वासन अभावानेच नागभीड तालुक्यात दिसून येतो. त्यामानाने या सातऱ्याच्या रुपाने मिळालेला रोजगार परिसरातील मजुरांना दिलासा देणारा आहे.
आम्ही यापूर्वी दुसऱ्या गावातील सातऱ्यावर जाऊन काम करीत होतो. यात आमचा बराच वेळ जात होता. या वेळीची बचत व्हावी म्हणून कंत्राटदाराने आम्हाला आमच्या गावीच सातरा उपलब्ध करुन दिला, असे एका महिला मजुराने सांगितले.