प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी बऱ्यापैकी दर मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवस कापसाचे दर स्थिरावले होते. आता पुन्हा दरवाढ झाली असून, वरोरा परिसरात कापसाच्या दराला प्रतिक्विंटल अकरा हजार रुपयांपेक्षाही झळाळी मिळाली आहे.वरोरा परिसर कापसाची पंढरी म्हणून ओळखला जातो. या परिसरात कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मध्यंतरीच्या काळात अनेक जिनिंग फॅक्टरी बंद झाल्याने शेतकरी कापूस विक्रीकरिता हिंगणघाट व वणी येथे जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व शारीरिक कष्ट पडत होते; परंतु अलीकडच्या काळात वरोरा परिसरात अत्याधुनिक सहा जिनिंग फॅक्टरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वरोरा तालुक्यासह यवतमाळ वर्धा जिल्ह्यातील शेतकरी कापूस विक्रीकरिता वरोरा परिसराला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कापूस विक्री सुरू झाली. ऑक्टोबर ते मार्च २०२२ पर्यंत चार लाख ३४ हजार ३२६ क्विंटल कापसाची आवक झाली आहे. अजूनही कापूस निघणे सुरू आहे. सुरुवातीपासून या हंगामात कापसाला अधिक दर मिळत आहे. मध्यंतरी रशिया व युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर कापसाचे दर स्थिर झाले होते. त्यामुळे दर वाढणार की नाही, या संभ्रमात शेतकरी व व्यापारी सापडले होते; परंतु चांगल्या प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल अकरा हजार रुपयांपेक्षा अधिक दर दिला जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिला आहे.
फरदड कापसाला आठ हजार रुपयेशेवटी निघणाऱ्या कापसाला फरदड असे म्हटले जाते. या कापसाला कवडीमोल भाव दिला जातो; परंतु सध्या फरदड कापूस प्रतिक्विंटल आठ हजार रुपये दराने घेतला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापसाचे पीक ठेवले असल्याचे दिसून येत आहे.