परवान्याविनाच खाद्य पदार्थ विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:25 IST2018-03-24T23:25:29+5:302018-03-24T23:25:29+5:30

चंद्रपूर महानगराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तशी व्यावसायिक प्रतिष्ठानेही वाढत आहे. काही वर्षात चंद्रपुरात हॉटेल्स, रेस्टारंटचीही संख्या वाढली आहे. गल्लीबोळात, रस्त्यावर, फुटपाथवरही खाद्य पदार्थाची दुकाने थाटली आहेत.

The food was sold without license | परवान्याविनाच खाद्य पदार्थ विक्रीला

परवान्याविनाच खाद्य पदार्थ विक्रीला

ठळक मुद्देअटींची पूर्तता गरजेची : हातठेल्यांवर कुणाचाच वॉच नाही

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर महानगराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तशी व्यावसायिक प्रतिष्ठानेही वाढत आहे. काही वर्षात चंद्रपुरात हॉटेल्स, रेस्टारंटचीही संख्या वाढली आहे. गल्लीबोळात, रस्त्यावर, फुटपाथवरही खाद्य पदार्थाची दुकाने थाटली आहेत. मात्र यातील बहुतांश हॉटेल्समधून परवान्याविनाच खाद्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती आहे. अनेकांनी परवाना नुतनीकरण न करताच हा व्यवसाय सुरू ठेवला आहे.
खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. त्यामुळे खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक निकषाची पूर्तता करावी लागते. मात्र या भानगडीत हॉटेल व्यावसायिक पडताना दिसत नाही. मागील काही वर्षात चंद्रपुरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. साडेचार लाखांच्याही पुढे हा आकडा गेला आहे. याशिवाय चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी दररोज हजारो नागरिक बाहेरगावावरून या ना त्या कामासाठी येतच असतात. त्यामुळे उत्पन्नाचे चांगले स्रोत म्हणून हॉटेल थाटून अनेक जणांनी आपले बस्तान मांडले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होऊन दोन वर्ष झाली आहेत. दारूबंदीनंतर अनेक बार अ‍ॅन्ड रेस्टारंटधारकांनी ‘बार’ शब्द काढून रेस्टारंट सुरूच ठेवले आहे. या रेस्टारंटमधून खाद्य पदार्थाची विक्री केली जाते.
नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत हा विषय असल्याने अशा हॉटेल्समध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते की नाही, वाहनतळ आहे की नाही, हे तपासून महानगरपालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून काही अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना परवाना दिला जातो.
एवढे सर्व करूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून इटींग परवानाही या हॉटेल्सधारकांना घ्यावा लागतो. हे परवाने दरवर्षी नुतनीकरण करून घ्यावे लागतात.
मात्र चंद्रपूर शहरातील अनेक हॉटेल्सधारकांनी इटींग परवाना नुतनीकरणच केला नसल्याची माहिती आहे. परवाना नसतानाही अशा हॉटेल्समधून सर्रास खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे.
इटींग परवाना मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची व अटींची पूर्तता करावी लागते. मात्र अनेक हॉटेल्समध्ये याची पूर्तता केली जात नसल्याचीही माहिती आहे. परवान्याशिवाय खाद्य पदार्थांची विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी असे सर्रास खेळले जात आहे.
हातठेल्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष
चंद्रपुरात रस्त्यारस्त्यांवर हातठेल्यांमधून खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यानंतर उघड्यावरच हे पदार्थ ठेवले जातात आणि विकलेही जातात. हे खाद्य पदार्थ खाऊन नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते. असे असतानाही याकडे महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन विभाग व जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. या दुकानांमध्ये जाऊन खाद्य पदार्थांच्या दर्जाची तपासणी करण्याचे सौजन्यही संबंधित विभागाकडून दाखविले जात नाही.

Web Title: The food was sold without license