भरधाव बोलेरो उलटली, जीवहानी टळली
By Admin | Updated: October 4, 2014 23:25 IST2014-10-04T23:25:21+5:302014-10-04T23:25:21+5:30
येथून जवळच असलेल्या हुळकी जामणी रस्त्याच्या बाजुलाच लागलेल्या दगडाच्या छोट्या खाणीत बोलेरो महिंद्रा पिकअप मालवाहक वाहन उलटले. सुदैवाने या अपघातातून दोघांचा जीव वाचला.

भरधाव बोलेरो उलटली, जीवहानी टळली
टेमुर्डा : येथून जवळच असलेल्या हुळकी जामणी रस्त्याच्या बाजुलाच लागलेल्या दगडाच्या छोट्या खाणीत बोलेरो महिंद्रा पिकअप मालवाहक वाहन उलटले. सुदैवाने या अपघातातून दोघांचा जीव वाचला. याच वेळी शाळा सुटल्याने या मार्गाने विद्यार्थिनींची गर्दी होती. मात्र सुदैवाने या वाहनाची कुणालाही धडक बसली नाही.
सायंकाळी ४ वाजता वरोरा येथून प्लास्टिकचे पाईप बोलेरो महिंद्रा पिकअप मालवाहक वाहनात भरले व वरोरा तालुक्यातील तुमगाव येथे हे वाहन जाण्यास निघाले असता, टेमुर्ड्याजवळ एका धाब्यावर वाहन चालक मनोज देवूरकर व वाहन मालक डोये या दोघांनीही मद्यप्राशन केले. दोघेही जामणी (बु) मार्गे वाहन घेवून निघाले असता जामणी (बु) व तळेगाव येथील शाळेत दररोज ये-जा करणाऱ्या विद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांना वाहनात बसविण्याच्या नादात मद्यपी मनोज देवूरकर यांचा वाहनावरून ताबा सुटला व भरधाव पाईपने भरलेली बोलेरो (एमएच ३४ एम ७८३८) जामणी (बु) रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दगडाच्या खाणीत उलटले. वाहनात चालक मनोज देवूरकर व मालक डोये हे दोघेच होते. मद्यधुंद अवस्थेत बसले होते. याच ठिकाणी दगडाच्या मोठमोठ्या खाणी पाण्याने भरलेल्या होत्या. पण सुदैवाने हे वाहन छोट्या खाणीत उलटले. अपघातानंतर दोघेही सुखरूप वाहनाबाहेर पडले. शाळकरी मुले-मुली विद्यालयीन युवक-युवती समोर निघून गेल्या होत्या तर काही मागे राहिले होते. ही घटना माहित होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघाताची कुठेही तक्रार करण्यात आली नाही. यापूर्वीही या ठिकाणी असाच अपघात घडला होता. (वार्ताहर)