भद्रावतीच्या मुख्य रस्त्यावरील फुलझाडांची कळी खुलेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST2021-02-21T04:52:48+5:302021-02-21T04:52:48+5:30
भद्रावती नगरपरिषद विकास कामांतर्गत टप्पा परिसरापासून ते नाग मंदिर परिसरापर्यंत द्विभाजकाच्या मध्यभागी विविध रंगाच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली. ही ...

भद्रावतीच्या मुख्य रस्त्यावरील फुलझाडांची कळी खुलेना
भद्रावती नगरपरिषद विकास कामांतर्गत टप्पा परिसरापासून ते नाग मंदिर परिसरापर्यंत द्विभाजकाच्या मध्यभागी विविध रंगाच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली. ही फुलझाडे संगोपणामुळे बहारली आहेत. फुले येण्यास सुरुवात झाली आहे. हे वृक्ष जपताना नगरपालिका कर्मचाऱ्यांना मोकाट जनावरांचा त्रास होता. त्याचा पूर्णत: बंदोबस्त केला. आता या वृक्षांच्या फुलांकडे पादचाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. देव पूजा असो की, इतर कार्यासाठी वा गुलदस्त्यात ठेवण्यासाठी येथील फुलांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. फुले तोडण्यास स्पर्धा निर्माण झाल्यागत चित्र सकाळी बघायला मिळते. फुलांसह कळ्याही तोडून नेत आहे. या सुंदर फुलांनी सजून दिसणारे द्विभाजक ओसाड दिसायला लागले आहे.
ऐतिहासिक पर्यटन नगरी भद्रावती
ऐतिहासिक भद्रावती नगरीत जैन मंदिर, नाग मंदिर, वरदविनायक मंदिर गवराळा, बौद्ध लेणी विजासन ही ऐतिहासिक स्थळे आहे. हे बघण्याकरिता व दर्शनकरिता मोठ्या संख्येने भाविक भद्रावती नगरीत येत असतात. पाहुण्यांना शहर स्वच्छ व सुंदर व फुलांनी सजलेले दिसले, तर त्यांना निसर्गरम्य वातावरण वाटेल व पुन्हा या नगरीकडे येण्याची ओढ लागेल.
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती नगरपरिषदेमार्फत चालू असून, शासनाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विविध भागांतील बगिचात वृक्षारोपण करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या शहरातील वृक्षांचे, फुलझाडांचे, फुलांचे घरच्या प्रमाणे जतन केले, तर सुंदर निसर्गरम्य पर्यटन भद्रावती नगरी हे नाव लौकिकास येईल.
- अनिल धानोरकर नगराध्यक्ष, न.प. भद्रावती