पाच महिन्यात १४ लाचखोर जेरबंद

By Admin | Updated: July 5, 2014 01:21 IST2014-07-05T01:21:58+5:302014-07-05T01:21:58+5:30

चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या पाच महिन्यांमध्ये १४ लाचखोरांना रंगेहात जेरबंद केले आहे.

Five months of 14 bribe jerbands | पाच महिन्यात १४ लाचखोर जेरबंद

पाच महिन्यात १४ लाचखोर जेरबंद

चंद्रपूर : चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या पाच महिन्यांमध्ये १४ लाचखोरांना रंगेहात जेरबंद केले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
कोणत्याही अधिकृत शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रशासनात कमी नाही. लाचेसाठी अनेकांना अकारण वेठीस धरले जाते. अशा त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांकडून प्राप्त तक्रारीवरून चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पाच महिन्यात लावण्यात आलेले १४ ही सापळे यशस्वी झाले आहेत. महावितरण कंपनीत लाईनमन पदावर काम करणाऱ्या विश्वास वेलादी याला १० फेब्रुवारी रोजी तीन हजार ५०० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर बल्लारपूर येथील तलाठी विनोद गानफाडे याला १२ फेब्रुवारी रोजी २० हजारांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी याला पाच हजारांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली १२ मार्च रोजी अटक करण्यात आली. क्रीडा अधिकारी मदन टापरे यांना १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी १४ मार्च रोजी अटक करण्यात आली. चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील विलास अहेर याला ८ एप्रिल रोजी चार हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. कोरपनाचे नायब तहसीलदार समीर माने यांना २८ मार्च रोजी पाच हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली. भद्रावती येथील नायक पोलीस शिपाई अंबादास रामटेके याला २९ मार्च रोजी सहा हजारांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सावली येथील तलाठी चंदा कोकाटे हिला एक हजार रुपयांची लाच स्विकारताना १५ मे रोजी अटक करण्यात आली. सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नरेश सुरमवार व त्यांच्या एका सहकाऱ्याला पाच हजारांची लाच स्विकारताना १९ मे रोजी अटक करण्यात आली. चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन उईके यांना २९ मे रोजी दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली. नागभिड पंचायत समितीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निलेश बावणकर याला दोन हजारांची लाच स्विकारताना १३ जून रोजी अटक करण्यात आली. चंद्रपूर येथील हत्तीरोग अधिकारी वामन बनकर यांना ३० जून रोजी दोन हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली. यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील तालुका कृषी ंअधिकारी राजेंद्र प्रेमराज राठी व धानोरा ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक प्रशांत बळवंत हेमके याला ५ जून रोजी पाच हजारांची लाच घेताना पकडले. (प्रतिनिधी)

Web Title: Five months of 14 bribe jerbands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.