पाच ग्रामपंचायतींना मुहूर्तच मिळेना
By Admin | Updated: May 24, 2017 02:13 IST2017-05-24T02:13:03+5:302017-05-24T02:13:03+5:30
प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली.

पाच ग्रामपंचायतींना मुहूर्तच मिळेना
मजुरांना कामाची प्रतीक्षा : तहसीलदारांच्या पत्राला केराची टोपली
भोजराज गोवर्धन।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. मात्र तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीने अजुनही कामाला सुरुवात केली नसल्यामुळे मजुरांना कामासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. सदर योजनेचे कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश तहसीलदार मूल यांनी ग्रामपंचायतींना दिले. मात्र त्या आदेशाला ग्राम पंचायतीने केराची टोपली दाखवली आहे.
शासनाने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. गावखेड्यातील प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, मजुरांचे इतरत्र स्थलांतर होवू नये यासाठी सदर योजना गावागावात राबविल्या जाते. परंतु, आजच्या स्थितीत अजूनही आकापूर, चितेगाव, हळदी, सितळा आणि टोलेवाही या ग्राम पंचायतीने कामाला सुरुवात केलेली नाही. सदर योजनेतंर्गत कामे सुरू करण्याबाबत तहसीलदार मूल यांनी २० मे रोजी येथील गटविकास अधिकारी पंचायत समिती मूल यांना पत्र पाठवून आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ कामे सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतु, सदर पत्राला ग्राम पंचायतीने केराची टोपली दाखविलेली आहे. २२ मेपर्यंत तालुक्यातील आकापूर, चितेगाव, हळदी सिंतळा आणि टोलेवाही या ग्राम पंचायतने कामाला सुरुवात केलेली नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मूल तालुक्यात १९९.५५ टक्के कामे करण्यात आलेले आहेत. त्यापैकी मूल पंचायत समितीने १७३.९८ टक्के कामे केलेले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तालुका कार्यक्रम समन्वयक तथा तहसीलदार मूल यांनी तालुक्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांना २० मे रोजी पत्र पाठवून सदर योजनेअंर्गत आपल्या अधिनस्त असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये किमान एक काम सुरू करावे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामाची मागणी होत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ कामे सुरू करून त्यावर मजुर उपस्थिती राहील याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले, सदर कामे दोन दिवसांत सुरू करून ग्रामपंचायत निहाय अहवाल कार्यालयात सादर करावे, असे आदेश दिलेले आहेत. परंतु, अजुनही अनेक ग्रामपंचायतीने कामाला सुरुवातच केलेली नाही. यामुळे तहसीलदाराच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे प्रत्येक गावात सुरू आहे. ज्या ग्रामपंचायतीने कामाला सुरुवात केलेली नाही त्या ग्राम पंचायतीची चौकशी करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याचे आदेश देवू अशी प्रतिक्रिया मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.