चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:30 IST2019-06-02T23:30:00+5:302019-06-02T23:30:30+5:30
चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आज रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आली. मात्र यात जंगलाची मोठी हानी झाल्याची माहिती आहे.

चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आगीचे तांडव
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आज रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आली. मात्र यात जंगलाची मोठी हानी झाल्याची माहिती आहे.
देशात चंद्रपूरमधील तापमानाने उच्चांक गाठला आहे. छोट्याशा ठिणगीचे रुपांतर मोठ्या आगडोंबात होण्यास येथे विलंब होणार नाही, असे येथील भीषण तापमान आहे. चंद्रपूर वीज केंद्र परिसरात असलेल्या जंगलात घडलेल्या या घटनेवरून त्याचीच प्रचिती येते. चंद्रपूर वीज केंद्राचा परिसर झुडुपांनी व्यापला आहे. वीज केंद्राच्या रिजेक्ट गेट ते इरई नदीलगत असलेल्या आवंडा गेटदरम्यान अॅश पाईपलगतच्या बाजूला असाच जंगलव्याप्त भाग आहे. या जंगलात अधिक प्रमाणात काटेरी बाभूळची झाडे आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या झुडुपांना अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. जराही विलंब न करता वीज केंद्राचे अग्निशमन पथकाने आग विझविण्याचे काम सुरु केले. मात्र, उष्ण तापमानाने ही आग अधिकच भडकत असल्याने मनपाच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. मनपाच्या अग्निशमन विभागाचे तीन वाहन घटनास्थळी दाखल झाले.े एकूण वाहनातील पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. सायंकाळी ६ वाजतादरम्यान ही आग अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आटोक्यात आली. आगीत सारे जंगल भस्मसात झाले. मात्र कुठलीही प्राणहानी वा वित्तहाणी झाली नसल्याची माहिती आहे.
पेट्रोल पंपवर दुचाकी पेटली
तुकूम येथे असलेल्या रोहित पेट्रोल पंपवर एका दुचाकीला अचानक आग लागली. तेथील कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधनाने तत्काळ आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने तुकूम येथील रोहित पेट्रोलपंपवर पेट्रोल भरले. त्यानंतर त्याने दुचाकी सुरु केली. त्याच वेळेत दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वार घाबरुन दुचाकी सोडून तेथून पळून गेला. वेळीच तेथील कर्मचाऱ्यांनी ही आग विझविली त्यामुळे येथील पुढील मोठा अनर्थ टळला.