देवाडा (खु.) येथे बैलाच्या गोठ्याला आग
By Admin | Updated: May 26, 2017 00:19 IST2017-05-26T00:19:43+5:302017-05-26T00:19:43+5:30
देवाडा खुर्द येथील शेतकरी नीलकंठ नैताम यांच्या घरासमोरील मांडवाला बुधवारला अचानक आग लागली.

देवाडा (खु.) येथे बैलाच्या गोठ्याला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : देवाडा खुर्द येथील शेतकरी नीलकंठ नैताम यांच्या घरासमोरील मांडवाला बुधवारला अचानक आग लागली. या आगीने गुरांच्या गोठ्याला वेढल्याने अनेक शेती साहित्य जळून खाक झाले. या घटनेत ५० हजार रूपयाचे नुकसान झाले. गावकरी व महसूल प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरने आग विझविण्यात आली.
देवाडा खुर्द येथील शेतकरी निळकंठ नैताम यांनी गोठ्याजवळ गुरे बांधण्यासाठी मांडव उभारला आहे. मात्र बुधवारी दुपारी २ वाजता मांडवाला अचानक आग लागली. मांडवावर तुरी पिकाचे तुराट्या असल्याने आणि त्याच्या खाली थोडी तणस असल्याने आगीचा भडका उडाला. संपुर्ण मांडव व गुराच्या गोठ्याला आगीने कवेत घेतले. तेव्हा शेजारच्यांनी आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले आणि मिळेल त्या साहित्याने पाणी टाकून आग विझवू लागले.
त्यानंतर तलाठी कनकुळवार यांनी मोक्यावर येऊन पाहणी करून तहसीलदार हरीश गाडे यांना ही माहिती दिली.
त्यांनी लगेच पाण्याची मोठी टॅकर घटनास्थळी पाठविली. आग विझण्यास मदत झाली. मांडवाखाली बैल बांधून असल्याने आगीचे चटके लागताच बैल दोर तोडून पसार झाले. त्यामुळे जनावरे बचावली. या आगीत कृषी अवजारे जळाल्याने ५० हजार रूपयाचे नुकसान झाले असून तहसीलदारांनी शासकीय स्तरावरून नुकसान भरपाई मिळवून देण्याची अशी मागणी आहे.