आगीत एक ट्रॅक्टर तुरीसह २० ट्रॅक्टर तणीस जळाले
By Admin | Updated: February 25, 2016 00:51 IST2016-02-25T00:51:51+5:302016-02-25T00:51:51+5:30
मंगळवारच्या रात्री २ वाजता तणसाच्या ढिगाऱ्याला आग लागून २० ट्रॅक्टर तणस व एक ट्रॅक्टर तूर जळून खाक झाल्याची घटना पिंपळगाव (भो.) येथे घडली.

आगीत एक ट्रॅक्टर तुरीसह २० ट्रॅक्टर तणीस जळाले
पिंपळगाव : मंगळवारच्या रात्री २ वाजता तणसाच्या ढिगाऱ्याला आग लागून २० ट्रॅक्टर तणस व एक ट्रॅक्टर तूर जळून खाक झाल्याची घटना पिंपळगाव (भो.) येथे घडली. यात शेतकऱ्यांचे अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पीडित शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपळगाव (भो.) येथील लक्ष्मीनारायण मंदिर गुरुदेव वाडी येथील नरेश कुथे व देवराव कुथे यांच्या आवारात तणसाचे ढिग व तुरीच्या शेंगाचे ढिग रचून ठेवले होते. मंगळवारच्या रात्री अचानकपणे ढिगांना आग लागली. घटनास्थळ दाट लोकवस्तीत असल्याने आग सर्वत्र पसरण्याची भीती निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील प्रभाकर बांगरे यांनी सरपंच भारती लांजेवार, उपसरपंच हेमराज कामडी व माजी जि.प. सदस्य उमाजी कुथे यांना घटनेची माहिती दिली. ब्रह्मपुरी व वडसा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. रात्री २ वाजता लागलेली आग बुधवारला सकाळी ८ वाजता आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
पावसाअभावी धानाचे खरीप पिक हाताचे गेले व रबी पिकाच्या आशेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याचे ७० हजार रुपयाचे रबी पिकही जळून खाक झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्यापुढे जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पीडित शेतकऱ्याला ताबडतोब आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)