अखेर शहीद करकरेंच्या नावाचा फलक लागला
By Admin | Updated: July 5, 2014 01:30 IST2014-07-05T01:30:08+5:302014-07-05T01:30:08+5:30
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची स्मृति जपण्यासाठी

अखेर शहीद करकरेंच्या नावाचा फलक लागला
चंद्रपूर : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची स्मृति जपण्यासाठी महाकाली पोलीस चौकीलगतच्या चौकाला ‘शहीद हेमंत करकरे चौक’ असे नाव देण्यात आले होते. मात्र कालांतराने ते फलकच बेपत्ता झाला. यासंदर्भात २ मे रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत त्या ठिकाणी पुन्हा त्याच नावाचा फलक लावण्यात आला आहे. उशिरा का होईना, तो फलक लागल्याने नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
सन १९९२-९३ मध्ये हेमंत करकर ेयांनी चंद्रपूर जिल्हा अधीक्षक म्हणून काम सांभाळले होते. त्यानंतर त्यांची येथून बदली झाली. पुढे २६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झालेत. त्यांच्या चंद्रपूरात त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात म्हणून २६ जानेवारी २०१० रोजी स्थानिक बागला चौकाचे नामकरण ‘शहीद हेमंत करकरे चौक’ असे करण्यात आले होते. मात्र तीन वर्षानंतर तो फलकच तेथून बेपत्ता झाला. तो तुटून पडल्याचे सांगण्यात येत होते. पण पुन्हा तो लावण्याचे सौजन्य कुणीच दाखविले नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने ‘कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या स्मृतीचा खात्यालाच विसर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासन कामाला लागले आणि तो फलक पुन्हा तेथे लावला. यापुढे या चौकाचा ‘शहीद हेमंत करकरे चौक’ असाच कागदोपत्री उल्लेख करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)