बनावट सातबाऱ्यावर चार लाख रुपये कर्जाची उचल
By Admin | Updated: July 8, 2014 23:21 IST2014-07-08T23:21:46+5:302014-07-08T23:21:46+5:30
बनावट सातबारा आठ अ व नकाशा तयार करुन मागील दोन वर्षात दोनदा चार लाख रुपयांच्या कर्जाची बँकेतून उचल केल्याचे लक्षात आल्याने बँकेच्यावतीने पोलिसात तक्रार देण्यात आली.

बनावट सातबाऱ्यावर चार लाख रुपये कर्जाची उचल
दोन दिवसांची पोलीस कोठडी : तलाठ्यासह एक अटकेत
वरोरा : बनावट सातबारा आठ अ व नकाशा तयार करुन मागील दोन वर्षात दोनदा चार लाख रुपयांच्या कर्जाची बँकेतून उचल केल्याचे लक्षात आल्याने बँकेच्यावतीने पोलिसात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरुन बनावट सातबारा देणारा तलाठी व शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
थोराना येथील नानाजी सिताराम भट (४५) यांच्या सर्व्हे क्र. १७६ मधील ३.२० आर जमिनीच्या सातबारावर एकून नऊ वारसदार होते. या वारसादारांची संमती घेतली नाही व त्यांची नावे सातबारावरुन कमी केली. त्याला फटाळा येथील तलाठी अक्षय रामगिरवार याने बनावट सातबारा, आठ व अ व नकाशा दिला. नानाजी भट याने बनावट दस्तावेज बँक आॅफ महाराष्ट्र कुचना येथे सादर करुन सन २०१३ मध्ये एक लाख रुपयांचे पीक कर्ज उचलले. सन २०१४ मध्ये अशाच प्रकारची बनावट कागदपत्रे तयार करुन बँक आॅफ महाराष्ट्र कुचना येथून शेतात बोअरवेलच्या खोदकामाकरिता तीन लाख रुपये कर्जाची उचल केली. बोअरवेल ज्या शेतात खोदण्याची, त्या शेतात खोदली नाही व दुसऱ्या शेतात खोदल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत चौकशी सुरु केली असता कर्ज प्रकरणात लावण्यात आलेले सातबारा, आठ अ व नकाशा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर माजरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ४२०, ४६८ भादंविने गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तामठे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)