राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : वाघांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आजघडीला दोनशेच्या जवळपास वाघाची संख्या आहे. वाढत्या संख्येमुळे वाघ गावशेजारी आले आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून कोलारा, मासळ परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. शेतीच्या कामासाठी गेलेल्या दोन तर मोहफुल, तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या तीन अशा पाच जणांना वाघाने ठार केले आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जात असताना मृत्यू समोर वाट बघत असल्याचे चित्र कोलारा परिसरातील गावात दिसत आहे. पाच जणांचा बळी घेणाऱ्या (केटी,१) वाघाला वन विभागाने बुधवारी जेरबंद केले. मात्र जेरबंद केलेल्या वाघाची आई व एक बछडा आजही त्या परिसरात आहेत. ताडोबा लागूनच असल्याने दुसरेही वाघ आहेतच. त्यामुळे किती वाघांना वनविभाग जेरबंद करणार आणि नागरिकांतील भय कधी संपणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.मागील काही दिवसांपासून वाघ सातत्याने हल्ले करीत असल्याने त्यांच्या आक्रमकतेपुढे शेतकरी हतबल ठरले आहेत. वाघांनी केलेल्या हल्ल्यांत आजपर्यंत एकट्या कोलारा परिसरात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला होता. याची दखल घेत वनविभागाने त्या चवताळलेल्या केटी १ वाघाला जेरबंद करून मासळ, कोलारा, बामनगाव, सातारा गावातील नागरिकांना दिलासा दिला आहे. असे असले तरी जेरबंद केलेल्या वाघाची आई शर्मिली व त्याचा एक भाऊ अजून त्या परिसरात आहे. ते चवताळून या परिसरात हल्ला करेल, अशीही भीती आहे.ताडोबा प्रकल्पाबाहेरही वाघांचा वावरताडोबा अंधारी प्रकल्प हे खास वाघासाठी आरक्षित अभयारण्य असले, तरीही जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर तालुक्यातील जंगल परिसरात वाघाची उत्पत्ती झाली आहे. विशेषता चिमूर, ब्रह्मपुरी तालुका आणि त्यातही भद्रावती मोहर्ली, जुनोना परिसर हे शेतकऱ्यांवर हल्ले करण्यासाठी वाघांनी दत्तक घेतले की काय, अशी शंका यावी, असा येथील वाघाच्या हल्ल्याचा इतिहास आहे.शर्मिलीचे कुटुंब तुटलेकोलारा गेट परिसर तथा मदनापूर बफर झोन परिसरात वास्तव असलेल्या शर्मिली वाघिणीच्या कुटुंबाने अनेक पर्यटकांना दर्शन देऊन त्यांचे समाधान केले. मात्र तिच्या एक बछड्याने पाच बळी घेतले. त्यामुळे त्याला वनविभाने जेरबंद केल्याने तिचा परिवार तुटून विस्कळीत झाला आहे.परिसरात मानव-वन्यजीव संघर्षताडोबाच्या जंगल क्षेत्राचा विचार करता वाघाची संख्या वाढल्याने हे क्षेत्र कमी पडू लागले आहे. त्यामुळे या गावातील नागरिक व वाघ यांचा संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात या व्यतिरिक्त दुसरे वाघ येऊन शेतकºयांवर हल्ला करू शकतात. तेव्हा आणखी किती वाघांना जेरबंद करणार आणि नागरिकांचे भय कधी संपणार, असा प्रश्न आहे.