संचारबंदीमुळे नागरिकांत भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:20+5:302021-04-15T04:27:20+5:30
चंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. प्रत्येकांची सरकार काळजी घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मागील ...

संचारबंदीमुळे नागरिकांत भीती
चंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. प्रत्येकांची सरकार काळजी घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मागील वर्षीचा लाॅकडाऊनचा अनुभव लक्षात घेता नागरिकांमध्ये सद्यस्थितीत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आमदारांना यासंदर्भात काय वाटते, यासंदर्भात त्यांचे मत जाणून घेण्यात आले आहे.
बाॅख्स
गरजूंना वेळीच मदत मिळावी हवी : सुधीर मुनगंटीवार
फोटो : सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : कोरोना अतिशय वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी तज्ज्ञ समितीने सुचविल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असेल. पण या निर्णयासोबतच काही सावधानीही घेणे अतिशय गरजेचे आहे. गरीब कल्याण पॅकेज देऊन गरिबांना साहाय्य करणे अत्यावश्यक आहे. साेबतच आरोग्याच्या विविध सुविधाही वाढविणे महत्त्वाच्या आहे. काॅल सेंटर सुरू करून प्रत्येकांना वेळीच मदत करणे गरजेचे आहे. अडचणीत असलेल्या प्रत्येक घटकांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे. लाॅकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णांना आवश्यक गोष्टी प्राप्त होत नसेल, गरजूंना मदत केली जात नसेल तर लाॅकडाऊनचा सकारात्मक फायदा होणार नाही. त्यामुळे सरकारने प्रथम या गोष्टींचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा. नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
--
कोरोना प्रसार थांबविण्यासाठी लाॅकडाऊन अपरिहार्य : किशोर जोरगेवार
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन करणे गरजेचे आहे. त्याचवेळी उपाययोजनाही करणे अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय सध्याची परिस्थिती बघता योग्यच आहे. मात्र गरिबांचे हाल होऊ नये यासाठी प्रत्येक घटकांना मदत करणेही महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी जाहीर केला आहे. मात्र त्यामध्ये स्पष्टता नसल्याने निधी कसा आणि कुठे खर्च करायचा हेही जाहीर करणे गरजेचे आहे. गरिबांना रेशन देणार आहे. मात्र कधीपासून आणि कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे, याबाबत स्पष्ट केले नसल्यामुळे संभ्रम आहे. विशेषत: प्रत्येक अधिकारी सद्यस्थितीत व्हीसीमध्ये अडकून पडले आहे. त्यामुळे त्यांचा व्हीसी बैठकीचा वेळ ठरवून अन्य वेळ सामान्य नागरिकांसाठी ठरवून देणे अत्यावश्यक झाले आहे.
--
संचारबंदी लागू करतानाच सर्व घटकांचा विचार : प्रतिभा धानोरकर
कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध हाच आता एकमेव पर्याय शिल्लक आहे. रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडून त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू करताना गरजूंना आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शिवभोजन, निवृत्तिवेतन योजना, बांधकाम कामगारांसाठी अनुदान, घरेलू कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले यासोबत आदिवासी कुटुंबांनाही मदत मिळणार आहे. या सर्व घटकांचा विचार करण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आवश्यक : सुभाष धोटे
शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना संकट वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संचारबंदीला नागरिकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. कोणतीही हयगय करू नये, आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. मुख्यमंत्र्यांनी सामान्य नागरिकांना लक्षात घेता विविध घोषणा केल्या आहे. त्यामुळे त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. नागरिकांनी न घाबरता संचारबंदीचे काटेकोरपणे पालण करावे. प्रत्येकाने लसीकरणाला प्राधान्य द्यावे. काम नसताना घराबाहेर पडू नये. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास कोरोनाला हरविणे शक्य होणार आहे.