दोन चिमुकल्या भावंडांचा घरातच संशयास्पद मृत्यू, घटनेनंतर बाप फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 10:40 AM2022-09-03T10:40:39+5:302022-09-03T12:50:06+5:30

आधी विष पाजले नंतर गळा आवळल्याचा संशय

Father Poisoned Two Children And Strangled Them in chandrapur district | दोन चिमुकल्या भावंडांचा घरातच संशयास्पद मृत्यू, घटनेनंतर बाप फरार

दोन चिमुकल्या भावंडांचा घरातच संशयास्पद मृत्यू, घटनेनंतर बाप फरार

Next

वरोरा (चंद्रपूर) : शहरालगत असलेल्या बोर्डा येथील एका घरात दोन चिमुकल्या भावंडांचे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्याही तोंडातून फेस निघत होता. दरम्यान, घटनेनंतर मुलांचे वडील बेपत्ता झाले आहेत. चिमुकल्यांवर आधी विषप्रयोग व नंतर गळा आवळून हत्या केल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बापच मुलांची हत्या करून फरार झाला असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

अस्मित (८) असे भावाचे तर मिस्टी (३) असे चिमुकल्या बहिणीचे नाव आहे. संजय श्रीराम कांबळे (रा. बोर्डा) हा खासगी शिकवणी वर्ग चालवतो, तर त्याची पत्नी ही शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला आहे. शुक्रवारी मुलगा अस्मित हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजीकडे गेला होता. यावेळी संजयने बहाणा करून त्याला घरी आणले, तर लहान मुलगी मिस्टी ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना घरात ठेवले. सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान मुलांची आई घरी आली असता, तिने दाराचे कुलूप उघडले तेव्हा दोन्ही मुले बिछान्यावर निपचित पडली होती. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि हालचाल बंद होती. तिने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मुलांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.

आर्थिक विवंचना

दरम्यान, या घटनेनंतर संजय कांबळे हा फरार झाला आहे. त्याचा भ्रमणध्वनीही बंद आहे. मागील काही दिवसांपासून संजय हा आर्थिक विवंचनेत होता आणि त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची बाब समोर आली आहे. त्यानेच मुलांची हत्या केली की काय? असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस संजय कांबळेचा शोध घेत आहेत.

Web Title: Father Poisoned Two Children And Strangled Them in chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.