बापरे! सहा वर्षीय मुलीच्या गालाचा कुत्र्याने तोडला लचका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 20:52 IST2023-03-08T20:52:30+5:302023-03-08T20:52:58+5:30
Chandrapur News खेळत असलेल्या एका चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला करून तिच्या गालाचा लचका तोडल्याची घटना मंगळवारी बल्लारपुरात घडली.

बापरे! सहा वर्षीय मुलीच्या गालाचा कुत्र्याने तोडला लचका
बल्लारपूर : सर्वोदय विद्यालयासमोरील मुरलीधर मंदिराजवळ आराध्या आशिष मानकर (वय ६ वर्षे, रा. गांधी वाॅर्ड) ही चिमुकली खेळत असताना एका कुत्र्याने तिच्या गालाला जोरदार चावा घेतला. यात गाल चांगलाच फाटला गेला. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा कुत्रा पिसाळलेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुलीचे वडील आशिष मानकर हे मिस्त्री काम करतात. घटनेनंतर कुटुंबीयांनी आराध्याला लगेच येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. डॉक्टरांकडून तिच्या गालावर तब्बल १९ टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.