राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By Admin | Updated: July 24, 2014 23:47 IST2014-07-24T23:47:19+5:302014-07-24T23:47:19+5:30
राष्ट्रीय कृषी विमा योजनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या,

राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
विभागांना पाठविले पत्र : आशुतोष सलिल यांच्या सूचना
चंद्रपूर : राष्ट्रीय कृषी विमा योजनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या, अशा आशयाचे पत्र त्यांनी सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील अधिसूचीत मंडळातील अधिसूचीत पिकांसाठी राष्ट्रीय कृषि विमा योजना खरिप २०१४ हंगामात राबविण्यात येत असून एकुण कमाल विमा संरक्षित रक्कम सरासरी उत्पन्नाच्या १५० टक्यापर्यंत घेण्याची तरतुद मंजुर करण्यात आलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच पिकांचा यात समावेश असून शेतकऱ्यांनी बँकेकडे प्रस्ताव सादर करण्याची व विमा हप्ता रक्कम भरण्याची अंतिम मुदत पिक पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१४ (उस पिका व्यतिरिक्त) यापैकी जे आधी असेल ते राहील. या योजनेत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना विमा हप्ताची ९० टक्के रक्कम तर इतर शेतकऱ्यांनी विमा हप्ताची १०० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.
सदर योजनेत समाविष्ट पिके, जोखीम स्तर, प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम व भरावयाच्या विमा हप्त्याचा दर तसेच इतर सूचना ५ जुलै रोजीच्या शासन निर्णयात निदेशित केल्या असून त्याची प्रत प्रत्येक गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
सदर सुधारित योजनेस व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करून आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात यावी. याकरिता गट विकास अधिकारी यांनी सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून आपल्या क्षेत्रातील सर्व कार्यालये, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय, शेतकरी गट, सेवाभावी संस्था आदींनी याबाबत अवगत करावे. योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)