शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थांची स्थापना करावी - सुभाष धोटे
By Admin | Updated: July 29, 2014 23:44 IST2014-07-29T23:44:51+5:302014-07-29T23:44:51+5:30
सहकार क्षेत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असून शेतातील मालाच्या खरेदी- विक्रीची व्यवस्था करण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थाची स्थापना करावी, असे आवाहन विदर्भ को- आॅपरेटीव्ह

शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थांची स्थापना करावी - सुभाष धोटे
चंद्रपूर : सहकार क्षेत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असून शेतातील मालाच्या खरेदी- विक्रीची व्यवस्था करण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थाची स्थापना करावी, असे आवाहन विदर्भ को- आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूरचे संचालक तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले.
गडचांदूर येथील सुखकर्ता मंगल कार्यालयात दि विदर्भ को- आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूर शाखा चंद्रपूरच्या वतीने आयोजित विक्रेता संमेलन व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन आमदार सुभाष धोटे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, संचालक दिलीप नलगे, जि.प. सदस्य नानाजी आदे, श्रीधरराव गोडे, माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे, विठ्ठलराव थिपे, रमाकांत कोमावार, मस्जीद कुरेशी, भाऊराव चव्हाण, दिवाकर बोर्डे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुभाष धोटे यांनी शासनाचे रासायनिक खत, बफर झोनमध्ये संस्थेचा सहभाग, शेतकऱ्याच्या बांधावर रासायनिक खते या शासनाच्या योजनेबाबत संस्थेची वाटचाल, जिल्ह्यातील सहकारी संस्था व बचत गटांचे सक्षमीकरण तसेच शेतकऱ्यांना पुरक धंदा, जोडधंदा, पशुपालन, शेतकऱ्यांच्या बांधावर फळ लागवड, अन्य जोडधंदा करण्याविषयी व शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता माती परिक्षण प्रयोगशाळा उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे रासायनिक खतांचा समतोल होईल व शेतजमिनीची सुपीकता कायम राहील.
कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे यांनी जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांकरिता विविध योजना, महिला बचत गटाच्या सक्षमीकरण करण्याच्या नविनतम योजना याबाबत माहिती दिली. संस्थेचे कार्यकारी संचालक हरिबाबू यांनी चालू खरिप हंगामाकरिता खत पुरवठा- मागणी तसेच संस्थेची वाटचाल व प्रगतीविषयी माहिती दिली.
संमेलनात रासायनिक खत उत्पादक संस्था, जिल्हा बँक , बी-बियाणे उत्पादक कंपनी, इत्यादींनी आपल्या उत्पादनाची प्रदर्शनी लावून शेतकऱ्यांना योजनाची माहिती दिली. संमेलनाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सहकारी संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, महिला बचत गटातील पदाधिकारी, पुरुष बचत गट पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)