पूल नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:14+5:302021-01-15T04:23:14+5:30
शेताकडे जाणारा गावातील हा मुख्य मार्ग असल्याने अनेक शेतकरी याच मार्गाने ये-जा करतात. शेतात साहित्य नेण्याकरिता शेतकऱ्यांना चारचाकी तसेच ...

पूल नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट
शेताकडे जाणारा गावातील हा मुख्य मार्ग असल्याने अनेक शेतकरी याच मार्गाने ये-जा करतात. शेतात साहित्य नेण्याकरिता शेतकऱ्यांना चारचाकी तसेच बैलगाडीचा वापर करावा लागतो. मात्र, नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाच्या मागणीसाठी अनेकदा गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे निवेदने सादर केली. मात्र, अद्यापही पुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. परिसरातील आसन खुर्द, लालगुडा, राजूरगुडा, कढोली आदी गावांना जोडणारा हा रस्ता गडचांदूर- कोरपना मार्गाला जोडणारा आहे. परंतु, पुलाअभावी प्रवाशांनासुद्धा ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. जवळपास ७० मीटर अंतराचा हा पूल बांधकामाकरिता याआधी जलसंधारण विभागाने पाहणी केली. साधारणत: दोन कोटी अंदाजित खर्च या कामाकरिता लागणार असल्याचे सदर विभागाचे म्हणणे आहे. पावसाळ्यात हा पूल नसल्याने शेतकऱ्यांना पुराचा सामना करावा लागत आहे. धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे बाराही महिने या नाल्यात पाणी असते. पूल-कम-बंधारा असे काम झाल्यास जवळपास २०० हेक्टरवरील शेतकऱ्यांना या पाण्याचा सिंचनाकरिता वापर होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.