लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिंथूर येथील रोशन कुळे किडनी विक्रीप्रकरणात एसआयटीने सोलापुरातून अटक केलेल्या कथित डॉ. क्रिष्णा (खरे नाव रामकृष्ण मल्लेशम सुंचू) याला एका किडनीसाठी एक लाख रुपयांचे कमिशन मिळायचे. त्यामुळे तो गरजूंना हेरून किडनी काढण्यासाठी प्रवृत्त करायचा. त्याच्या माध्यमातून जवळपास १२ जणांनी कंबोडियातील प्रेआ केत मेलीआ हॉस्पिटल, फ्नॉम पेन्ह, कंबोडिया (मिल्ट्री हॉस्पिटल) येथे किडनी विकल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी (दि.२३) माध्यमांना दिली. या प्रकरणात रामकृष्णला कोलकात्यात भेटलेला एजंटही लवकरच पोलिसांच्या जाळ्यात असेल, असे संकेतही त्यांनी दिले.
सन २०१५ मध्ये व्यवसायात अपयशानंतर आर्थिक तंगीमुळे रामकृष्णने फेसबुकवरील 'किडनी डोनर' या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून या तस्करीच्या रॅकेटच्या संपर्कात आला. २०१८ मध्ये तो त्या ग्रुपमधील एका एजंटला कोलकाता येथे भेटायला गेला. या एजंटनेच त्याला कंबोडिया येथे नेले. तेथे त्याने स्वतःचीही किडनी विकली. यानंतर तोही रॅकेटचा भाग झाला. उच्चशिक्षित व फ्ल्यूएंट इंग्रजी बोलणारा रामकृष्ण नंतर डॉ. क्रिष्णा या नावाने एजंटाचे काम करू लागला होता.
'ते' बँक खाते कुणाचे ?
रोशन कुळेला किडनी विक्रीचे आलेले आठ लाख रुपये भारतीय बैंक खात्यातून वळते करण्यात आले आहेत. कंबोडियात किडनीची शस्त्रक्रिया झाली असताना भारतीय बँक खात्यातून रोशनच्या खात्यात पैसे आल्याने ते बँक खाते कुणाचे आहेत, याअनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कुळेला एक कोटींची ऑफर ?
ज्या दिवशी कुळेच्या या प्रकाराची चर्चा व्हायला लागली त्या दिवशी ब्रह्मपुरीतील आरोपी सावकारांनी त्याला तक्रार मागे घेण्यासाठी एक कोटींची ऑफर दिल्याची चर्चा ब्रह्मपुरी शहरात रंगत आहे.
तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट, कोलकाता हॉटस्पॉट
रामकृष्णला किडनी काढण्यासाठी कंबोडियाला नेणारा एजेंट हा प्रथम त्याला कोलकाता येथेच भेटला, तर रोशन कंबोडियात जाण्यापूर्वी रामकृष्णला कोलकाता येथेच भेटला. त्यामुळे या किडनी तस्करीचे हॉटस्पॉटच कोलकाता ठरले आहे.रोशनसोबतच नाशिक येथील एक व उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांतील काही युवक होते. मात्र, नाशिक येथील युवक पसार झाला होता. कंबोडियात किडनीविक्रीसाठी बांगलादेशातीलही काहीजण होते. त्यामुळे या प्रकरणातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी अवयव तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
Web Summary : A kidney selling case exposed an international trafficking network. The accused, 'Dr. Krishna,' earned commissions recruiting donors. Victims sold kidneys in Cambodia. The investigation is ongoing, focusing on bank accounts and other potential victims across states, revealing Kolkata as a hotspot.
Web Summary : किसान की किडनी बेचने के मामले ने अंतरराष्ट्रीय तस्करी का जाल उजागर किया। आरोपी 'डॉ. कृष्णा' कमीशन पर डोनर भर्ती करता था। पीड़ितों ने कंबोडिया में किडनी बेची। जांच जारी है, बैंक खातों और अन्य संभावित पीड़ितों पर ध्यान केंद्रित किया जा रहा है, कोलकाता एक हॉटस्पॉट के रूप में सामने आया है।