शेतातील पिके लागली कोमेजू
By Admin | Updated: August 17, 2014 23:04 IST2014-08-17T23:04:04+5:302014-08-17T23:04:04+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असृन दुबार-तिबार पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे.

शेतातील पिके लागली कोमेजू
रत्नाकर चटप - लखमापूर
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असृन दुबार-तिबार पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे.
खरीपाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने हजेरी न लावल्याने बीज अंकुरण्याची प्रक्रिया मंदावली तर काही ठिकाणी बी सडून गेले. यातच आर्थिक फटका सहन करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. परंतु आता पावसाने हुलकावणी दिल्याने शेतात उभ्या रोपट्यांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असल्याने पिकांना पाणी दिले जात आहे. मात्र पाण्याची पातळी खालावत असल्याने मुबलक पाणी पिकांना देता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पुराने नदीलगतच्या शेतकऱ्यांचे उभे पिक वाहून गेले तर रब्बी हंगाम अकाली पावसाने कहर केल्याने पुन्हा नापिकीचा सामना करावा लागला. यातच अनेक शेतकऱ्यांनी उधारवाडी करून व बँकेचे कर्ज घेऊन चालू हंगामात बि-बियाणे व शेतीउपयोगी साधनांची खरेदी केली. परंतु या सर्व कष्टावर पाणी फेरले जात असून यावर्षी दुष्काळस्थिती डोळ्यासमोर दिसत असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. सद्यस्थितीत शेतात हिरवी पिके उभी दिसत असली तरी वाढ मात्र खुंटली आहे. आतापर्यंत कापूस, सोयाबीन पिकांना फळधारणेची अवस्था यायला हवी होती. मात्र पावसाअभावी दुबार-तिबार पेरणी करावी लागत असते. पिकांची अवस्था बिकट असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबरोबर काही शेतामध्ये झाडाची पाने पिवळी-तपकिरी दिसत असून रोगाचे सावट काही अंशी दिसत आहे. पिकांना पाणीच नसल्याने फवारण्या मंदावल्या असून उभी पिके कोमेजण्याची शक्यता आहे. गेल्या आठ-पंधरा दिवसात आकाशात ढग दिसत असले तरी प्रत्यक्षात पाण्याचा जोर मात्र मंदावला आहे.
शेतकऱ्यांनी सुरूवातीला अनेक महागडी बियाणे पेरून व नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक पिक घेण्याच्या ध्येयाने आगेकुच केली. मात्र आताही निसर्गराजाची अवकृपा दिसत नसल्याने शेतपिके संकटात सापडली आहे. अनेक वर्षांपासून शेतीत कसणाऱ्या बळीराजाची अवस्था गंभीर आहे. पिकलं ते विकलं जात नाही, अशी अवस्था आहे.
काही प्रमाणात पाऊस अधूनमधून येत असला तरी पाहिजे त्या प्रमाणात जमिनीत ओलावा दिसत नाही. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी धावपळ सुरू केली असली तरी पाणीच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात कापूस, सोयाबीन मिरची तूर आदी नगदी पिके घेतली जातात. या पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. पाण्याशिवाय झाडाची वाढ तसेच उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. याउलट गेल्या वर्षीपासून निसर्गाने साथ न दिल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.
दुबार-तिबार पेरणी करून शेतकऱ्यांनी पिके जगवली असली तरी वातावरणातील उष्णता बघता पिके नष्ट घेण्याच्या मार्गावर आहे. अशातच पावसाचा वेग वाढला नाही तर पाण्याअभावी डोळ्यादेखत पिकांची हाणी होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.