सावकाराकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By Admin | Updated: July 5, 2014 01:18 IST2014-07-05T01:18:03+5:302014-07-05T01:18:03+5:30
नजीकच्या निमणी येथील घुलाराम कान्हु राऊत (६०) या शेतकऱ्याच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन ...

सावकाराकडून शेतकऱ्यांची फसवणूक
गडचांदूर : नजीकच्या निमणी येथील घुलाराम कान्हु राऊत (६०) या शेतकऱ्याच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन गडचांदूर येथील एका सावकाराने १६ हजारात लाखोंची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोरपना पोलिसांनी सावकार शोयब गिलानी व अन्य तिघांवर भांदवीच्या कलम ४२०, ४६७ व ३४ नुसार गुन्हे दाखल करुन अटक केली आहे. यामुळे अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. शोयब गिलानी रा. गडचांदूर, अर्जनविस एम.एम. हुसेन रा. राजुरा, संजय आनंदराव दिवसे व अमोल गौरकार दोन्ही रा. निमणी अशी आरोपींची नावे आहे. घुलाराम कान्हू राऊत यांच्या मुलींचा विवाह असल्याने त्यांना १६ हजार रुपयांची गरज होती. त्यांनी गावातील संजय दिवसे यांच्याकडे आपली अडचण मांडली. संजयने शेतकऱ्याला तुझे काम अमोल गौरकार करुन देतील, असे सांगितल्यानंतर घुलाराम अमोल गौरकार यांच्याकडे गेले. दोघांनी लगेच घुलाराम यांना गडचांदूरला चल तुला पाहिजे तेवढे पैसे देतो असे म्हणून गडचांदूर येथील सावकार शोयब गिलानी यांची भेट करुन दिली. घुलाराम राऊत यांना शोयब गिलानी यांनी १०० रुपयांचा मुद्रांक, नमूना आठ व सातबारा आणण्यास सांगितले. त्यावर १६ हजार दिले म्हणून लिहायचे सोडून घुलाराम राऊ यांच्याकडे असलेल्या तीन एकर शेतीचे इसार व विक्रीपत्राची तयारी गिलानी यांनी केली होती. घुलाराम राऊत समक्ष कोरपना येथील अर्जनविस एम.एम. हुसेन यांना गडचांदूरला बोलावून गिलानी यांनी नमूना आठ, सातबारा व घुलाराम राऊत यांचे छायाचित्र दिले. अशिक्षितपणाचा फायदा घेत व्याजाने १६ हजार रुपये घेतल्यानंतर गावातील संजय दिवसे आणि अमोल गौरकार यांनी ३५ हजार रुपयांच्या मुद्रांकावर सह्या करायला सांगितल्या. नंतर सर्व जण मिळून कोरपना येथील तहसील कार्यालयात गेले आणि तेथे अर्जनविस हुसेन यांनी घुलाराम यांच्या सह्या घेतल्या. मात्र मुद्रांकावर लिहिले काय ते वाचून दाखविले नाही. मात्र त्याचवेळी बाजूला असलेल्या एका व्यक्तीने ते वाचवून दाखविल्यावर त्यावर पाच लाख रुपये दिल्याचे नमूद होते. त्यामुळे घुलाराम घाबरले आणि पोलिसांत तक्रार केली. राजुरा येथील आयपीएस अधिकारी शर्मा यांच्या सांगण्यावरुन कोरपना पोलिसांनी ताबडतोब कारवार्ई करुन आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)