पावसाच्या सरीने शेतकरी सुखावला
By Admin | Updated: July 24, 2014 23:47 IST2014-07-24T23:47:58+5:302014-07-24T23:47:58+5:30
तालुक्यातील सर्व परिसरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावून शेतात पेरलेल्या बियानांच्या अंकुराना जीवदान मिळाले आहे. बऱ्याच कास्तकाराने जून महिन्यात पेरणी केली.

पावसाच्या सरीने शेतकरी सुखावला
राजुरा : तालुक्यातील सर्व परिसरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावून शेतात पेरलेल्या बियानांच्या अंकुराना जीवदान मिळाले आहे. बऱ्याच कास्तकाराने जून महिन्यात पेरणी केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे पेरणी वाया गेली. शेतकरी आर्थिक व मानसिकरित्या हतबल झाला होता. अचानक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे.
यंदा पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले. पाऊस निसर्गाची देण आहे. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. तसेच आवश्यकता व मर्जीनुसार पाऊस पडणे अद्याप शक्य झाले नाही. असे असताना शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे महागडे बियाणे खरेदी करून जून महिन्यात पेरणी केली. परंतु पावसाने दगा दिला. जून महिना कोरडा गेला.
वातावरणातील उष्णतेमुळे अंकुर वाळून गेले. शेतकरी ढगाकडे पाहून दुबार पेरणीची वाट पाहत होते. थोडा पाऊस पडताच दुबार पेरणी केली व येरे येरे पावसा तुला देतो पैसा करीत वरुणराजाला साकडे घालीत होते. नुकतेच ३-४ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली व बियाणाच्या अंकुरांना जिवदान मिळाले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
तरीपण दीड महिन्याचा कालावधी लोटल्यामुळे पिकावर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या कापूस व सोयाबीनचे बियाणे उगवले आहे. त्याचा वाढ होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेतून पिक कर्ज घेवून शेतात बियान्याची पेरणी केली. परंतु प्रथम केलेली पेरणी वाया गेली. बिकट परिस्थितीत दुबार पेरणी केली व पावसाने साथ दिल्यामुळे थोडेफार उत्पन्न घेण्याची आशा निर्माण झाली आहे. यावर्षी उत्पन्नात निश्चित घट होणार आहे. पंरतु शेतकऱ्यांना खर्च नेहमीप्रमाणे करावे लागणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व खर्चाच्या मोबदल्यात पिकाचे उत्पन्न होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यास योग्य दर मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांची स्थिती सुधारू शकते.
(तालुका प्रतिनिधी)