वेकोलिच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतीचे नुकसान
By Admin | Updated: July 27, 2014 00:02 IST2014-07-27T00:02:58+5:302014-07-27T00:02:58+5:30
तालुक्यातील कुनाडा या गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात आले. यामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने पावसाळ्यात या गावातील वाहून जाणारे पाणी विठ्ठल पारखे या शेतकऱ्याच्या शेतात जाते.

वेकोलिच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतीचे नुकसान
भद्रावती : तालुक्यातील कुनाडा या गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात आले. यामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने पावसाळ्यात या गावातील वाहून जाणारे पाणी विठ्ठल पारखे या शेतकऱ्याच्या शेतात जाते. शेतात पाणी साचून राहत असल्याने पारधे यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतकरी विठ्ठल पारधे यांची जमीन (मौजा विजासन साजा नं.सर्व्हे ३५१) कुनोडा या पुनर्वसीत गावाला लागून आहे. कुनाडा गावातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पारधे यांच्या शेतात साचते. वेकोलिच्या नियोजनाशुन्यतेमुळे हा प्रकार घडत असल्याचे पारधे यांनी सांगितले. वेकोलिला याबाबत वारंवार निवेदन देण्यात आले. खा. हंसराज अहीर यांनीसुद्धा याबाबत सी.जी.एम. वेकोलि यांना पत्र पाठवून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र याकडे अद्याप वेकोलि प्रशासनाने लक्षच दिलेले नाही.
शेताची मोका चौकशी करून आपणास मोबदला देण्यात येईल, असे सांगून वेकोलिकडून केवळ दिशाभूल करण्यात येत असल्याचे पारधे यांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर शेतीची नुकसान भररपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व या परिणामास वेकोलि सर्वस्वी जबाबदार राहील, असे विठ्ठल पारधे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)