चिमूरच्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध मखराचा बैल
By Admin | Updated: September 12, 2015 00:53 IST2015-09-12T00:53:39+5:302015-09-12T00:53:39+5:30
चिमूर तालुक्यातील शंकरपुरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरुअसलेली मकर बैलाच्या पोळ्याची परंपरा आजही कायम आहे.

चिमूरच्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध मखराचा बैल
चिमूर तालुक्यातील शंकरपुरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरुअसलेली मकर बैलाच्या पोळ्याची परंपरा आजही कायम आहे. मकर बैलामुळे गावावर कोणतीच आपत्ती येत नसल्याची अनेकांची श्रद्धा आहे.
शंकरपूर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशमुख पाटील यांच्या वाड्यातून मकरबैल निघण्याची प्रथा आहे. त्यांनी आपला वाडा व शेती डहाके परिवाराला विकले. देशमुख परिवाराने चालविलेली प्रथा आजही डहाके परिवार आनंदाने व श्रद्धेने चालवित आहे. डहाके यांच्या वाड्यात बैलाला सांजसिंगाराने सजविले जाते व नंतर त्यांच्या डोक्यावर मकर ठेवले जाते. हे मकर लाकडापासून बनविले जात असून षटकोणी आकाराचे असते. प्रत्येक कोणात दिवा लावण्यासाठी जागा तयार करण्यात येते. त्या कोणात पेटता दिवा ठेवल्या जाते. हा लाकडाचा मकर बैलाच्या मानेवर व डोक्यावर ठेवल्या जाते. बँड वाजाच्या पथकात हा मकराचा बैल पोळा भरतो, त्या ठिकाणी आणल्या जाते. तिथे भक्तीभावाने पूजा केल्यानंतर समोर मकराचा बैल व त्यानंतर इतर बैलाच्या जोड्या असतात. तोरण बांधलेल्या ठिकाणापर्यंत असेच चालत येतात. आंब्याच्या पानाचे तोरण तोडल्यानंतर हा मकराचा बैल हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी नेतात. तेथून पोळा फूटला असे गृहीत धरल्या जाते. मकराच्या बैलाला विशेष मान असल्यामुळे त्या बैलाच्या समोर कोणतीच बैल जोडी जात नसते. हा मकर बैल परिसरात कुठेच निघत नसल्याने पंचक्रोशीतली जनता शंकरपूर येथे येतात.
या मकर मुळे गावावर कोणतीच आपत्ती येत नाही. तसेच जणावरांना सुदृढ आरोग्य लाभते असे अनेकांचे म्हणणे आहे. मकरावर ठेवण्यात आलेल्या दिव्याचा आशिर्वाद घेण्यासाठी जनतेत चढाओढ असते.