आरोग्य योजनेतून कुटुंबातील सदस्यांची नावे गहाळ
By Admin | Updated: September 13, 2014 01:13 IST2014-09-13T01:13:31+5:302014-09-13T01:13:31+5:30
शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे...

आरोग्य योजनेतून कुटुंबातील सदस्यांची नावे गहाळ
भेजगाव : शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे आरोग्य पत्र प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत पात्र लाभार्थी कुटुंबापर्यंत वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर योजनेचे आरोग्यपत्र नागरिकांच्या हाती आले असले तरी, आरोग्यपत्रात अनेक सदस्यांची नावेच गहाळ झाली आहेत. त्यामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत.
आरोग्य योजना चांगली असली तरी कुटुंबातील काही सदस्यांची नावे नाही तर काहींची चुकीचे नाव असल्याने या योजनेपासून त्या सदस्यांंना लाभ घेता येणार नाही. परिणामत: शासनाची ही योजना फसवी ठरणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये आहे.
योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा दारिद्रयरेषेखालील पिवळे शिधापत्रीकाधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा व दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रधारक यांचा योजनेत समावेश आहे.
ग्रामीण भागात गरीबीचे प्रमाण जास्त असून महागाईच्या काळात सामान्य कुटुंब होरपळून निघत आहे. हातावर आणून पाणावर खाण्याची संख्या अधिक आहे. अशा कुटुंबाना आरोग्याची जटील समस्या भेडसावली की, कुटुंब फक्त मरण शोधतो. गरीबांच्या या समस्येवर जीवनदान देण्याच्या दृष्टीने शासनाने आरोग्य योजनेअंतर्गत आधार देण्याच्या संकल्पनेतून ही योजना कार्यान्वीत केली. मात्र, योजनेच्या सुरुवातीलाच आरोग्यपत्रात त्रृट्या असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभा आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना असून त्यात निवडक ९७१ गंभीर आजारावर व १७१ पाठपुरावा सेवांवर या योजने अंतर्गत रुग्णालयातून उपचार घेता येणार आहे. आरोग्य पत्रात गावातील बंडूजी लाकडे यांच्या कुटुंबात चार सदस्य असताना आरोग्यपत्रात फक्त कुटुंब प्रमुख बंडू लाकडे यांचेच नाव तर श्रीहरी गणविर यांच्या कुटुंबात तीन व्यक्ती असताना त्यांचे एकाचेच नाव असून भलत्याच व्यक्तीचे नाव आरोग्यपत्रात समाविष्ठ आहे. अशाप्रकारे अनेकांच्या आरोग्यपत्रात चुका आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष दीड लाख रुपये पर्यंत व मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडिच लाख रुपया पर्यंत महाराष्ट्र शासनाने विमा हप्ता करुन निवडक आजारांसाठी रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. मात्र आरोग्यपत्रातच नावेच नसल्याने अनेकांना जीव धोक्यात घालून उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रशासनाने आरोग्यपत्रात सुधारणा करुन नवीन आरोग्यपत्र देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)