Extreme heat wave in Chandrapur | चंद्रपुरात तीव्र उष्णतेची लाट

चंद्रपुरात तीव्र उष्णतेची लाट

ठळक मुद्देसोमवारपासून नवतपा । प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषत: चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची संभावना आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी चंद्रपुरात ४५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर शनिवारी ४५.६ अंश सेल्सीयस नोंदविले गेले. त्यामुळे आता कोरोना संसर्गासोबतच संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभीच म्हणजे मार्च महिन्यातच कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. उद्योगासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग बंद झाले. रस्त्यावरील वाहने थांबली. त्यामुळे यावर्षी हॉटसिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात उन्हाळ्यात तापमानात घट आली होती. यावर्षीचा उन्हाळा असाच दिलासादायक राहील, असे वाटले होते. मात्र आता मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर तापमानाने उच्चांक गाठणे सुरू केले आहे. शुक्रवारी चंद्रपूरचे तापमान ४५.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. त्यानंतर शनिवारी ४५.६ अंशाची नोंद झाली. दरम्यान, पुढचे पाच दिवस आणखी तापमानात वाढ होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर तसेच सृष्टीतील इतर जीवजंतूंवर दुष्परिणाम होतात. उष्णतेशी निगडित आजारपण व मृत्यू टाळता येणे शक्य आहे. दरवर्षी अनेक लोक उष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अधिक जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या आहेत. येत्या काही दिवसात पुन्हा ही लाट चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.

उष्माघाताची लक्षणे
अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे ही लक्षणे आढळल्यास थंडगार पाण्याने अंघोळ करावी. (डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते), थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ देऊ नका
उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू टाळण्यासाठी नागरिकांनी उपाययोजना राबवाव्यात. कारण अगोदरच आरोग्य यंत्रणेचा कोरोनाबाबत लढा सुरू असल्याने तसेच आता येणाºया उष्णतेमुळे लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होवून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घेत रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ देऊ नये, अशा सूचना भारतीय हवामान खात्याने दिल्या आहेत.

नागरिकांनो, हे कराच
घरातच रहा अकारण बाहेर पडू नका. रेडिओ ऐका, टीव्ही तसेच वर्तमानपत्र वाचा. उष्णतेबाबत व कोविड-१९ बाबत तपशील पहा. खबरदारी घ्या.
काही वेळावेळाने मुबलक पाणी प्या. तहान लागली नसेल तरीही थोडे थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे. द्रव प्रतिबंधित आहार ज्यामध्ये मुत्राशय, हृदय विकार व लिवरबाबत यांच्यासाठी वर्ज करण्यात आला आहे, त्यांनी जास्त पाणी पिण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काही वेळावेळाने मुबलक पाणी प्या. तहान लागली नसेल तरीही थोडे थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे.
आपले शरीर हायड्रेट राहण्यासाठी, घरगुती तयार केलेली पेय यामध्ये लिंबू पाणी, लस्सी, ताक, तोराणी-तांदुळापासून तयार केलेले पेय किंवा ओआरएस घ्यावे.
हलके व हलक्या रंगांचे, ढिले व कॉटनचे कपडे वापरा. बाहेर पडू नका. मात्र जर बाहेर जावेच लागले तर डोके झाका, तोंडाला रूमाल लावा व छत्रीचा वापर करा. कुठेही इतरत्र स्पर्श करणे टाळा.
बाहेर सामाजिक अंतर पाळा. हात वारंवार स्वच्छ धुवा.

Web Title: Extreme heat wave in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.