पिण्याच्या पाण्यासाठी मिळाला मुबलक निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:29 IST2018-06-02T22:29:10+5:302018-06-02T22:29:24+5:30
यंदाच्या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी १३९४ गावांत २०५६ विविध उपाय योजनांकरिता २५.५५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईशी निगडित मूलभूत स्वरूपाची कामे पावसाळ्यातही पूर्ण होणार आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी मिळाला मुबलक निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदाच्या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी १३९४ गावांत २०५६ विविध उपाय योजनांकरिता २५.५५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईशी निगडित मूलभूत स्वरूपाची कामे पावसाळ्यातही पूर्ण होणार आहेत.
सप्टेंबर २०१७ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाच्या ५३.३३ टक्के एवढाच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये १.५१ मीटरने घट झाली. भूजल पातळी सर्वेक्षण विहिरींच्या पाण्याच्या पातळीवरून मागील उन्हाळ्याच्या तुलनेत यावर्षी जास्त टंचाई जाणवली. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरुन पाणी टंचाईचे तिनही टप्प्याचे नियोजन करून संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मंजुरी प्रदान केली. त्यामध्ये जिल्ह्यातील ९५८ गावांमध्ये १३६१ उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या.
त्यातील बरीच कामे सुरू आहेत. १८.८१ रुपये कोटींच्या पाणी टंचाई आराखड्यातील काम मूलभूत कामे पावसाळ्यातही सुरू राहणार आहेत. कामे. ४३६ गावांमध्ये ६९५ प्रस्तावित उपाय योजनांकरिता ६.७४ कोटी रुपयांच्या पुरवणी आराखड्यासही मंजुरी मिळाली. त्यामुळे २५.५५ कोटी रुपयांच्या उपाययोजनांचा समावेश होता. आराखड्याची अंमलबजावणी करण्यास्तव प्रत्येक गावनिहाय जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते.
त्यानुसार सर्वेक्षणाअंती ७७४ विंधन विहिरीपैकी ४५६ विंधन विहिरी या तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरलेल्या आहेत. २५४ नळ योजना विशेष दुरुस्तीपैकी ४० नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे इतर योजनेतून सुरू असल्याने वगळण्यात आली. उर्वरीत २१४ ची कामे लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. मंजूर आराखड्यातील उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये १५५ विंधन विहिर खोदणे व हातपंप बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. १६७ नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती आणि पूरक नळ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील कोरपना, जिवती, राजूरा या तालुक्यामध्ये पाणी टंचाई अधिक प्रमाणात जाणवत असल्याने आजमितीस तीन गावांमध्ये शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
दोन गावांमध्ये खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच ३६ खासगी विहिरी अधिग्रहीत करून त्याद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा नेटाने प्रयत्न करीत आहे.