बालरोगतज्ज्ञाकडून लाखोंची वीजचोरी उघड
By Admin | Updated: September 18, 2014 23:32 IST2014-09-18T23:32:50+5:302014-09-18T23:32:50+5:30
महावितरण कंपनीकडून वीज चोरी करू नका, यासाठी वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही वीजचोरीचे प्रकार घडतच आहेत. आतात चंद्रपुरातील प्रतिष्ठित बालरोगतज्ज्ञ डॉ. एम.जे. खान यांच्या

बालरोगतज्ज्ञाकडून लाखोंची वीजचोरी उघड
चंद्रपूर : महावितरण कंपनीकडून वीज चोरी करू नका, यासाठी वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही वीजचोरीचे प्रकार घडतच आहेत. आतात चंद्रपुरातील प्रतिष्ठित बालरोगतज्ज्ञ डॉ. एम.जे. खान यांच्या दवाखान्यातच दोन लाख ६७ हजारांची वीज चोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या वीजचोरीत डास मारण्याच्या रॅकेटमध्ये रिमोट बसवून त्याद्वारे मीटरचे रिडींग कमी केले जात होते, हे विशेष.
डॉ. खान यांचा येथील जिल्हा परिषदेसमोरच्या परिसरात मोठा दवाखाना आहे. रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्थाही या रुग्णालयात आहे.
दरम्यान या दवाखान्यातून मागील अनेक दिवसांपासून वीज चोरी होत असल्याची शंका महावितरण कंपनीला आली. त्यांनी या मीटरचे सर्व रेकॉर्ड तपासून बघितले. महावितरणच्या चंद्रपूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.व्ही. वाशिनकर व त्यांच्या पथकाने खान यांच्या दवाखान्यात जाऊन मीटरची तपासणी केली. त्यानंतर या दवाखान्यातून १८ हजार २५६ युनीट्सची वीज चोरी झाल्याची बाब उघडकीस आणली. या युनीटची किंमत दोन लाख ६७ हजार रुपये असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उल्लेखनीय असे की ही वीज रिमोटच्या माध्यमातून मोठ्या शिताफीने केली जात होती. डास मारण्याची रॅकेटमध्ये एक छोटेखानी रिमोट बसविण्यात आला होता. या रिमोटने वाट्टेल तेव्हा मीटर रिडींग बंद करण्यात येत होती. याप्रकरणी महावितरण कंपनीने डॉ. खान यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत युनीटचे दोन लाख ६७ हजार व दंडाचे ४० हजार रुपये वसूल केले. सोबत रिमोट लावलेली ती रॅकेटसुध्दा जप्त करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)