सरस स्वयंसिद्धा महोत्सवातून ७० लाखांचे उत्पन्न अपेक्षित
By Admin | Updated: February 28, 2017 00:36 IST2017-02-28T00:36:58+5:302017-02-28T00:36:58+5:30
विदर्भात प्रथमच चंद्रपूर होणाऱ्या विभागीय स्तरावरील सरस महोत्सव ‘स्वंयसिध्दा-२०१७’ च्या आयोजनातून प्रशासनाला ७० लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची...

सरस स्वयंसिद्धा महोत्सवातून ७० लाखांचे उत्पन्न अपेक्षित
एम. देवेंदर सिंह : सहा जिल्ह्यातून २५६ बचत गटांचा सहभाग
चंद्रपूर : विदर्भात प्रथमच चंद्रपूर होणाऱ्या विभागीय स्तरावरील सरस महोत्सव ‘स्वंयसिध्दा-२०१७’ च्या आयोजनातून प्रशासनाला ७० लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भातील सहा जिल्ह्यातील २५६ महिला बचतगट या महोत्सवात सहभागी होणार असून २ ते ६ मार्च या काळात हे आयोजन स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे पार पडत आहे. राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, आणि चंद्रपूर व गडचिरोलीची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वंयसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री हा यामागील हेतू आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्यातील २५६ महिला स्वंयसहाय्यता समुहांचे स्टॉल राहणार आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ११० बचत गटांना निमंत्रित करण्यात आले आहे. ५०० ते ६०० महिला या महोत्सवासाठी मुक्कामी येणार असून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था ओम भवन आणि बुरडकर सभागृहात करण्यात आली आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून विभागप्रमुख आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या त्यात समावेश आहे.
मागील वर्षी जिल्हास्तरीय महोत्सवातून ३५ लाख रूपयांचे उत्पादन झाले होते. या वर्षी हे उद्दीष्ट दुपटीने वाढविण्यात आले आहे. कॅशलेस व्यवहाराचे महत्व लक्षात घेता पेटीएम आणि भीम अॅपची व्यवस्था केली जाणार आहे. सर्व सहभागी बचत गटांनाही या कॅशलेस व्यवहाराच्या व्यवस्थेत सहभागी केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महोत्सवाचे उदघाटन २ मार्चला सकाळी १०.३० वाजता होणार असून दररोज सांयकाळी ७ वाजतापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात २ मार्चला गजल नवाज भीमराव पांचाळे यांचा कार्यक्रम, ३ मार्चला कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांचे नृत्य, ४ मार्चला ‘असा नवरा नको ग बाई’ हे नाटक आणि ५ मार्चला ओडिसी नृत्यांगना बिंदू जुनेजा यांच्या नृत्याचा कार्यक्रम असे नियोजन आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
पॉस मशिन्सचा तुटवडा
कॅशलेस व्यवहाराचे महत्व लक्षात घेवून बँक आॅफ इंडिया आणि स्टेट बँकेकडे जिल्हा परिषदेने २५० पॉस मशिन्सची मागणी केली होती. मात्र मशिन्सचा तुटवडा असल्याने त्या देण्यात बँकांच्या व्यवस्थापनाने असमर्थता दर्शविली. या मशिन्स अस्थायी स्वरूपात देता येणे शक्य नसल्याने विकत घेणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे भीम अॅप आणि पेटीएमच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
केवळ २ हजार २०० बचतगट सक्रिय
जिल्ह्यात सुमारे १० हजाराच्या जवळपास बचत गट आहेत. असे असले तरी अनेक बचत गट निव्वळ कागदावर आहेत. फक्त २ हजार २०० बचतगटच सक्रिय असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. अन्य बचत गट केवळ व्याजाने रकमा देण्याचे काम करतात, त्यामुळे बचत गटांची सावकारी ग्रामीण भागात सुरू असल्याचे यावेळी पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. असे होत असेल तर बचत गट स्थापनेच्या उद्देशाचा अर्थ काय, अशी विचारणाही पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.