चंद्रपूर : एक माणूस जर व्यवसाय उभारू शकत नसेल, तर पाच-पंचवीस लोकांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारावे. इतर समाजाचे लोक एकत्र येऊन व्यवसाय करतात. मात्र, कुणबी समाजात हे दिसून येत नाही. त्यामुळे बदलत्या काळानुसार सर्वांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारावे. जेणेकरून समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारेल व समाज पुन्हा मोठ्या संख्येने संघटित होईल, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय त्रीदिवसीय ऑनलाइन उपवधू-वर परिचय मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी कुणबी समाज मंदिर येथे आयोजित सत्रात खासदार बाळू धानोरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. पुरुषोत्तम सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर मालेकर, प्रमोद काकडे, विवेक खुटेमाटे, प्रभाकर दिवसे, अरविंद मुसळे, अनिल वाग्दरकर, मनोहर पाऊणकर, सुधाकर अडबाले, प्रा. विजय बदखल, अतुल देऊळकर, सतीश मालेकर, अरुण मालेकर, विनोद पिंपळशेंडे, प्रा. रवींद्र झाडे आदींची उपस्थिती होती.
खासदार धानोरकर यांनी समाज चालविण्यासाठी संघटन आवश्यक आहे. संघटनेतूनच समाजहिताची कामे होतात. शिवाय एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजासाठी कार्य करण्याचे मत मांडले. महिला सक्षमीकरण, शेतक-यांच्या विषयांवरही त्यांनी मत मांडले. तसेच कुणबी समाज मंडळासाठी रुग्णवाहिका आपल्या निधीतून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झालीत. निवडक उपवर-उपवधुंचा परिचय मेळावा पार पडला. या ऑनलाइन मेळाव्यासाठी विजय मुसळे यांचे विशेष योगदान लाभत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेस विशेष सहकार्य केल्याबद्दल श्रद्धा सपाट यांचा सत्कार करण्यात आला.
संचालन प्रा. नामदेव मोरे, प्रा. अनिल डहाके, अस्मिता गौरकार यांनी केले. आभार विलास माथनकर यांनी मानले.