बाजार समिती निवडणुकीत बरोबरीचा सामना

By Admin | Updated: September 1, 2015 00:50 IST2015-09-01T00:50:16+5:302015-09-01T00:50:16+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी स्थानिक राजीव गांधी भवन परिसरात मत मोजणीनंतर...

Equal match with the market committee elections | बाजार समिती निवडणुकीत बरोबरीचा सामना

बाजार समिती निवडणुकीत बरोबरीचा सामना

एकूण १८ जागा : भैया-तिडके गटासह भाजप-काँग्रेस व राष्ट्रवादी युतीलाही नऊ जागा
ब्रह्मपुरी: कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी स्थानिक राजीव गांधी भवन परिसरात मत मोजणीनंतर एकूण १८ जागांवर भैया- तिडके गटाला नऊ तर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला नऊ जागा मिळाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा सामना बरोबरीत रंगला.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन रविवारी ३० आॅगस्टला मतदान प्रक्रीया पार पडली. मतदानापूर्वी भैया-तिडके गट व भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकल्याने निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. एकीकडे भाजप व काँग्रेस एकत्र आल्याने बाजार समितीचे चित्र एकहाती पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु भैया व तिडके गटानेही या निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारल्याने निकालाचे वेगळे चित्र पाहायला मिळाले आहे. मतदानानंतर घोषित झालेल्या निकालानुसार भैया- तिडके गटाचे मापारी गटामधून प्रकाश बुरांडे, सेवा सहकारी संस्था गटातून ऋषी बगमारे, सुरेश दर्वे, दिवाकर मातेरे, सोमेश्वर पत्रे, राजेश तलमले, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून सुनिता खेमराज तिडके, ग्रामपंचायत गट (आर्थिक दुर्बल गटातून) रणवीर ठाकरे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून ब्रम्हदेव दिघोरे विजय झाले आहेत, तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे सेवा सहकारी संस्था गटातून नामदेव लांजेवार, वामन मिसार, सेवा संस्था महिला राखीव गटातून सूचित्रा ठाकरे, ईतर मागासवर्गीय गटातून प्रभाकर सेलोकर, अनु. जाती जमाती गटातून प्रमोद मोटघरे, सर्वसाधारण गटातून प्रमोद चिमूरकर, योगेश राऊत तर यापूर्वी व्यापारी गटातून अविरोध निवडून आलेले नितीन उराडे व मुन्ना कावळे असे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही गटांना समान जागा मिळाल्याने आगामी सभापती निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीत आर्थिक दुर्बल घटकातून तालुका काँग्रेस पार्टीचे सचिव थानेश्वर कायरकर पराभूत झाले आहेत. ते यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मेंडकी ग्रामपंचायतीतही पराभूत झाले होते, हे विशेष. या निवडणुकीत दोन्ही गटाकडून मतदारांचे भाव वधारले होते. अशी चर्चा मतदानाच्या दिवशी ऐकविण्यात होती. या निवडणुकीच्या निमित्ताने कधी नव्हे एवढी चुरस नागरिकांना पहायला मिळाली. आता बाजार समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागते, याकडे ब्रह्मपुरीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Equal match with the market committee elections