प्रवेश प्रक्रियेचा घोडेबाजार तेजीत

By Admin | Updated: May 1, 2015 01:16 IST2015-05-01T01:16:30+5:302015-05-01T01:16:30+5:30

एप्रिल महिन्यातील शालांत परीक्षा संपल्या आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भटकंती सुरू झाली.

Entrance Process Horseback riding | प्रवेश प्रक्रियेचा घोडेबाजार तेजीत

प्रवेश प्रक्रियेचा घोडेबाजार तेजीत

तळोधी (बा.): एप्रिल महिन्यातील शालांत परीक्षा संपल्या आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भटकंती सुरू झाली. वर्ग पाचवी व वर्ग आठवीमध्ये प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना सुगीचे दिवस आले असले तरी शिक्षकांमध्ये मात्र प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची टी.सी. मिळविण्याकरीता आपसातच चढाओढ दिसून येत आहे. त्यामुळे तळोधी (बा.) परिसरात एका टी.सी.चा दर पाच हजार रुपयांवर पोहचल्याचे शिक्षकांकडून बोलले जात आहे.
शासनाच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत १४ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना शिक्षण देणे बंधनकारक आहे. या अध्यादेशाच्या शैक्षणिक धोरणानुसार वर्ग १ ते ५ पूर्व माध्यमिक, वर्ग ६ ते ८ प्राथमिक, वर्ग ९ ते १० माध्यमिक व वर्ग ११ आणि १२ उच्च माध्यमिक असे शाळांचे वर्गीकरण करण्यात आले. परंतु, सध्याच्या परिस्थितीनुसार वर्ग १ ते ४, वर्ग ५ ते ७, वर्ग ८ ते १० व वर्ग ११ व १२ या स्तरावर शाळेची रचना आहे. वर्ग ४ थीची शाळा असलेल्या प्रत्येक शाळेला वर्ग ५ वा जोडणे व वर्ग ७ वा असलेल्या जिल्हा परिषद शाळांना वर्ग ८ वा जोडण्याचा मागील वर्षी शासन स्तरावरुन प्रयत्न करण्यात आला.
या प्रयत्नात शासनाला काही अंशी यश मिळाले तर अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ व वर्ग ८ वा सुरूच झाले नाही. परंतु परिसरातील जिल्हा परिषद शाळांत वर्ग ५ वा व वर्ग ८ वीचे वर्ग सुरू झाले त्या खासगी माध्यमिक शाळातील संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांना आपल्या शाळातील वर्ग ५ व ८ वीच्या तुकड्या टिकविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे.
शासनाच्या धोरणानुसार वर्ग ५ चे वर्ग चवथ्या वर्गांना शाळांना जोडणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा परिषद शाळांत वर्ग ४ असणाऱ्या शाळांत वर्ग ५ वी चे वर्ग सुरू केले असले तरी वर्ग ५ ते १० च्या शाळातील वर्ग ५ वीचे वर्ग बंद केले नाही. त्यामुळे शाळा संचालकांनी वर्ग ५ व ८ वीच्या तुकड्या टिकविण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्फत शिक्षकांना वेठीस धरणे सुरू केले आहे.
याचाच परिणाम म्हणून खासगी माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकडून हजारो रुपयांची वर्गणी केली जात आहे व सदर रक्कम पालकांना प्रलोभन देण्यासाठी सर्रास वापर होत आहे. त्यासाठी पालकांवर प्रलोभनासोबतच साम, दाम, दंड व भेद या सर्व नितीचा वापर होत आहे.
काही पालक शिक्षकांच्या या नितीला बळी पडून विद्यार्थ्यांच्या बालमनाचा किंवा परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता मुलांची टी.सी. संबंधिताकडे देवून मोकळे होत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी भविष्यात शाळाबाह्य ठरण्याची दिसून येत आहे.
वर्ग ५ वी व वर्ग ८ वी ची टिसी मिळविण्याकरीता शिक्षकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तके, प्रवास खर्च व नगदी पाच हजार रुपये किंवा त्यांच्यावरचे दर ठरल्याची माहिती काही शिक्षकांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. या सर्व प्रकारांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षक- शिक्षकांमध्ये मतभेद निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रातील पवित्र व निर्मळ वातावरण दूषित होत आहे, हे मात्र निश्चित. (वार्ताहर)

Web Title: Entrance Process Horseback riding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.