बल्लारपूर येथे जादूटोणा विरोधी कायद्याबाबत प्रबोधन
By Admin | Updated: July 1, 2014 23:26 IST2014-07-01T23:26:03+5:302014-07-01T23:26:03+5:30
अंगणवाडी कर्मचारी संघटना बल्लारपूर तालुकाच्या वतीने अंगणवाडी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जादूटोणा विरोधी कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले.

बल्लारपूर येथे जादूटोणा विरोधी कायद्याबाबत प्रबोधन
बल्लारपूर : अंगणवाडी कर्मचारी संघटना बल्लारपूर तालुकाच्या वतीने अंगणवाडी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जादूटोणा विरोधी कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदना मुळे होत्या. यावेळी सिटूचे जिल्हा प्रमुख रमेशचंद्र दहविडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक पी.एम. जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी जाधव यांनी शासनाने पारित केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याबाबत पोस्टरच्या सहाय्याने माहिती दिली. जादूटोणा, भूत- भानामती करणी, अंगात येणे व अलौकीक शक्ती यावर आधारित चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करुन त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन सांगितले. चमत्कारामागील शंकाचे निरसन जाधव यांंनी आपल्या प्रबोधनातून केले. जादूटोणा, भूत- भानामती, करणी, अलौकीक शक्ती, तंत्रमंत्र, ज्योतिष्य, वास्तुशास्त्र, नरबळी दिल्याने गुप्तधन मिळणे हे सर्व थोतांड आहे. ढोंगी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी समाजामध्ये पसरविलेल्या या अफवा आहेत. यावर विश्वास ठेवू नका, अशी विनंती त्यांनी केली. महाराष्ट्र अंनिसच्या समितीसमोर चमत्कार घडवा २१ लाख रुपये मिळवा, असे आवाहन जाधव यांनी या प्रसंगी केले. रमेशचंद्र दहिवडे यांंनीही मार्गदर्शन केले. कुंदा पावडे यांनी प्रास्ताविक केले. आभार रेखा राममटेके यांनी मानले. मेळाव्यासाठी वर्षा वाघमारे,लिडबे, खनके, राजंटी, अलोणे, शिला शिवणकर आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)