इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दुर्बल घटक वंचितच
By Admin | Updated: August 1, 2014 00:12 IST2014-08-01T00:12:49+5:302014-08-01T00:12:49+5:30
महाराष्ट्र शासनाने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २०१४ च्या शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांकरिता २५ टक्के प्रवेश आरक्षण घोषित केले व त्यानुसार संबंधित शाळांना, शाळेच्या दर्शनी भागावर

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दुर्बल घटक वंचितच
बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २०१४ च्या शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांकरिता २५ टक्के प्रवेश आरक्षण घोषित केले व त्यानुसार संबंधित शाळांना, शाळेच्या दर्शनी भागावर सूचना फलक लावून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, काही शाळा या शासकीय आदेशाची अवहेलना करुन दुर्बल आणि वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आढळून येत आहे.
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत एकूण २२ इंग्रजी कॉन्व्हेंट असून त्यापैकी सहा या अल्पसंख्यांक मान्यता प्राप्त आहेत. यापैकी रेड रोज कान्व्हेंट, आयडियल इंग्लीश स्कूल, विद्याश्री कान्व्हेंट, बल्लारपूर पब्लिक स्कूल येनबोडी या चारच शाळांनी सदर प्रवेशा संबंधीच्या सूचना फलक आपल्या शाळेत लावले आहेत. शाळात नर्सरी ते पहिल्या वर्गात २५ टक्के राखीव तरतुदीनुसार प्रवेशासाठी एकूण १७४ जागा उपलब्ध असताना फक्त ७१ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला.
१०३ जागा अजूनही रिकाम्या आहेत. प्रत्येक शाळेत वंचित व दुर्बल घटकाचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे, या जागा भरणे सहज शक्य आहे. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा त्या जागा स्वार्थापायी भरत नाहीत. ते शासनाची दिशाभूल करीत आहे. अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी बल्लारपूर आपच्या नेतृत्वात येथील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी संजय हेडाऊ यांना निवेदनातून केली आहे. तसे न केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या दिला आहे.
शिष्टमंडळात परमजित सिंग झगडे, स्वामी रायबरन, बशीर खान, समशेर सिंह चव्हाण सुनिता कावडे, पत्रू समर्थ आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)